ओटवणे/ प्रतिनिधी–
ओटवणे दशक्रोशी विकास सोसायटीच्या चेअरमनपदी आत्माराम उर्फ दाजी गावकर तर व्हाईस चेअरमनपदी स्वप्निल उपरकर यांची बिनविरोध निवड करण्यात आली. या सोसायटीच्या नवनिर्वाचित संचालकांच्या खास बैठकीत एकमताने निवड करण्यात आली. यावेळी निवडणूक अधिकारी म्हणून आर आर आरावंदेकर उपस्थित होते.
ओटवणे दशक्रोशी सोसायटीच्या कार्यक्षेत्रात ओटवणेसह विलवडे, सरमळे, भालावल, कोनशी, तांबोळी, असनिये, घारपी, दाभिल, या नऊ गावांचा समावेश आहे. या सोसायटीचे कार्यक्षेत्र मोठे असूनही या सोसायटीची पंचवार्षिक निवडणूक बिनविरोध झाली होती.ओटवणे देवस्थानचे मानकरी तसेच तंटामुक्त समिती अध्यक्ष असलेल्या दाजी गावकर यांनी यापूर्वी गावचे माजी सरपंचपद, ओटवणे दशक्रोशी समिती अध्यक्ष, तंटामुक्त समिती अध्यक्ष आदी विविध पदे भूषविली असून ओटवणे शाळा नं १ शतक महोत्सव समितीचे अध्यक्ष आहेत.
यावेळी सोसायटीचे नवनिर्वाचित संचालक रवींद्र म्हापसेकर, बाळकृष्ण दळवी, पांडुरंग तळवडेकर, गुंडू जाधव, प्रकाश दळवी, प्रदीप दळवी, संतोष सावंत, शशिकांत गोसावी, आनंद मयेकर, शृती गावकर, भाग्यलक्ष्मी गावडे उपस्थित होते. यावेळी नवनिर्वाचित चेअरमन दाजी गावकर आणि व्हाईस चेअरमन स्वप्नील उपरकर यांचे माजी उपसभापती विनायक दळवी, सरपंच उत्कर्षा गावकर, गावकर, उमेश गावकर, संतोष कासकर, बाळा गावकर, सगुण गावकर, गटसचिव अश्विनी तावडे, लिपिक लुमा जाधव, काका नाईक आदींनी अभिनंदन करून पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.
यावेळी दाजी गावकर यांनी दशक्रोशीचे भूषण असलेल्या सोसायटीची स्वतःची इमारत साकारण्यासाठी सर्वांना विश्वासात घेऊन प्रयत्न करणार असल्याची ग्वाही दिली. तसेच सोसायटीच्या माध्यमातून ओटवणे दशक्रोशीतील शेतकऱ्यांसह लघुउद्योजक व महिला वर्गांना विविध योजनांचा लाभ मिळवून त्यांना आर्थिक दृष्ट्या सक्षम करण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे सांगितले.