भावोजीला वाचविण्याचा प्रयत्नात मेव्हणा बुडाला
प्रतिनिधी/ फोंडा
ओकांब-धारबांदोडा येथील दुधसागर नदीच्या पात्रात एक कामगार बुडाल्याची घटना काल रविवार दुपारी उघडकीस आली. सिद्धू मितेश मिश्रा (24, रा. उसगांव मूळ उ.प्रदेश) असे त्याचे नाव आहे. बुडल्यानंतर तो नदीच्या पात्रात बेपत्ता झाला असून फोंडा पोलीस व अग्निशामक दलातर्फे शोधमोहीम सुरू आहे. घटनास्थळावरून अग्निशामक दलाला नदीच्या पात्रात बोट उतरविण्यात अडथळा निर्माण झाल्यामुळे आज सकाळी भारतीय नौदलच्या पाडबुडय़ाना व बोटच्या सहाय्याने शोधमोहीमेला सुरूवात करण्यात येणार आहे.
फोंडा पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार उसगांव येथील नेस्ले कंपनीतील कंत्राटी कामगारांचा आठ जणांचा समूह संजीवनी साखर कारखान्याच्या पाठिमागे असलेल्या दुधसागर नदीच्या पात्रात आंघोळीसाठी दाखल झाला होता. आठ जणांमध्ये काही एकमेकांचे नातेवाईकच होते. सर्वजण आंघोळीचा आनंद घेत असताना बुडालेला सिद्धू हा पाण्यापासून काहीअंशी दूरच होता. येथूनच त्याने अचानक नदीतील पाण्याचा प्रवाह वाढत असल्याचे न्याहाळले होते. पाण्यात असलेल्या आपल्या भावोजीला किनाऱयावर येण्य़ासाठी हाका मारल्या, त्यानंतर त्याला वाचविण्यासाठी थेट पाण्य़ात उडी घेतली. पोहण्यात तरबेज असलेला भावोजी कसाबसा किनाऱयावर आला मात्र भावोजीला वाचविण्यासाठी पाण्य़ात उडी घेतलेला मेव्हणा यावेळी पाण्य़ाच्या प्रवाहात वाहून गेला. तो अजून बेपत्ता आहे. अग्निशामक दलाला नदीकीनारी बोट उतरण्यात मिळत नसल्यामुळे अडचणी झाली. याप्रकरणी आज सकाळी वैद्य फार्मातून अग्निशामक दलाची बोट प्रवेश घेणार आहे. त्यानंतर शोध मोहीमेला प्रारंभ होणार आहे. याप्रकरणी उपनिरीक्षक आदित्य वेळीप अधिक तपास करीत आहे.
सूचनाफलक उभारण्यापुर्वीच बुडण्याची घटना
फोंडय़ाचे पोलीस उपअधिक्षक सी एल पाटील यांनी वाढत्या बुडण्याच्या घटनेवर नियंत्रण ठेवण्याहेतू फोंडा पोलीस स्थानकाच्या हद्दीतील कोडार व ओकांब येथील दुधसागर नदीच्या पात्रात बुडण्याऱया धोकादायक स्थळावर सुचनाफलक उभारण्यासाठी सुचनाफलकही तयार करून ठेवलेले आहेत. त्याची उभारणी करण्यात येणार होती त्यापुर्वीच ही दुर्देवी घटना घडली. यापुर्वी मडगांव येथील स्वयंसेवी संस्था व जिल्हाधिकाऱयानी ग्रामस्थांच्या तक्रारीनुसार ओकांब-धारबांदोडा व कोडार येथील स्थळावर भेट देत उपाययोजना व रोबोट पोलीसांना गस्त घालण्याचे आदेश देण्यात आले होते. तरीही पोलिसांना बुडण्याच्या घटनावर नियंत्रण ठेवण्यात अजून यश आलेले नाही.
सुचनाफलक उभारले तरीही युवक दाखल होण्याचे प्रकार
ओकांब-धारबांदोडा येथील नदीच्या पात्रात बुडाल्याची अनेक घटना यापुर्वी घडलेल्या आहेत. त्यानंतर धारबांदोडा पंचायतीने एक ठराव घेऊन सदर स्थळावर येणाऱयावर निर्बध घातलेले आहेत. असे सुचनाफलकही उभारलेले आहे. तरीही काही जण या स्थळावर दाखल होत असतात. पाण्य़ाचा प्रवाह वाढलेला असून अनेक ठिकाणी पाण्य़ाचा अंदाज येत नसल्य़ाने असे प्रकार घडत असतात. या पात्रात मगरींचेही वास्तव्य असून येथील ग्रामस्थ येथे आंघोळीसाठी जात नसल्याची माहिती पोलिसांनी दिली. स्थानिक पंचसदस्य शांबा गावकर यांनी ग्रामस्थांच्या मदतीने धोकादायक स्थळावर सुचनाफलक उभारलेले आहे. तरीही उकाडा असहय़ झाल्यामुळे ग्रामस्थांच्या नजरा चुकवत युवक दारूच्या नशेत पाटर्य़ात करीत आंघोळ करण्याचे प्रकार सुरू असतात. सुट्टीच्या दिवसांनी हे प्रकार वाढू लागलेले आहेत. पोलीसांनी या स्थळावर गस्त घालावी अशी मागणी स्थानिकांनी केली आहे.









