वृत्तसंस्था/ ब्रिस्बेन
ऑस्ट्रेलियाचे माजी ग्रॅन्डस्लॅम विजेते टेनिसपटू 83 वर्षीय ऍस्ले कूपर यांचे दीर्घकालीन आजाराने निधन झाले. त्यांनी आपल्या वैयक्तिक टेनिस कारकीर्दीत 1958 साली ऑस्ट्रेलियन, विम्बल्डन आणि अमेरिकन ग्रॅन्डस्लॅम टेनिस स्पर्धेत एकेरीचे अजिंक्यपद पटकाविले. कूपर यांनी एकूण चारवेळा ग्रॅन्डस्लॅम एकेरीची अजिंक्यपदे मिळविली आहेत.
ऑस्ट्रेलियन टेनिस संघटनेमध्ये ते बरीच वर्षे कुशल प्रशासक म्हणून कार्यरत होते. एटीपीच्या क्रमवारीत त्यांनी एकेरीत अग्रस्थानही मिळविले होते. 1957 साली कूपर यांच्या नेतृत्वाखाली ऑस्ट्रेलियन संघाने अमेरिकेचा पराभव करत डेव्हिस चषक पटकाविला होता. 1959 साली त्यांनी पाठदुखीमुळे व्यावसायिक टेनिस क्षेत्रातून निवृत्ती पत्करली. ऑस्ट्रेलियात क्रीडा क्षेत्रामध्ये बरीच वर्षे प्रशासक म्हणून ख्याती मिळविली. तसेच ते उद्योगपती म्हणूनही गणले गेले. कूपर यांनी हौशी टेनिस क्षेत्रात चारवेळा दुहेरीची ग्रॅन्डस्लॅम अजिंक्यपदे मिळविली. टेनिस ऑस्ट्रेलियातर्फे कूपर यांना शुक्रवारी श्रद्धांजली वाहण्यात आली.