वृत्तसंस्था/ झुरिच
येत्या जानेवारीमध्ये होणाऱया ऑस्ट्रेलियन ग्रॅण्ड स्लॅम टेनिस स्पर्धेत स्वीसचा अनुभवी टेनिसपटू रॉजर फेडरर याच्या सहभागाविषयी साशंकता व्यक्त केली जात आहे. रॉजर फेडरर हा अद्याप पूर्णपणे तंदुरूस्त नसल्याचे सांगण्यात आले.
39 वर्षीय रॉजर फेडररच्या डाव्या गुडघ्यावर काही दिवसापूर्वी दोन शस्त्रक्रिया करण्यात आल्या होत्या. या दुखापतीतून तो अद्याप पूर्णपणे बरा झालेला नाही. येत्या ऑगस्टमध्ये फेडरर 40 व्या वर्षात पदार्पण करणार आहे. 2020 च्या ऑस्ट्रेलियन ग्रॅण्ड स्लॅम स्पर्धेत फेडररने आपला शेवटचा सामना खेळला होता. या स्पर्धेत उपांत्य फेरीच्या सामन्यात सर्बियाच्या जोकोव्हिचकडून फेडररला हार पत्करावी लागली होती. फेडररने आपल्या वैयक्तिक टेनिस कारकीर्दीत एकेरीची 20 ग्रॅण्ड स्लॅम अजिंक्यपदे मिळविली आहेत. त्याच्या गुडघ्यावर दुसऱयांदा शस्त्रक्रिया करण्यात आली. त्यानंतर गेल्या सहा महिन्यांच्या कालावधीत या दुखापतीमध्ये संथ सुधारणा होत आहे. ऑस्ट्रेलियन ग्रॅण्ड स्लॅम टेनिस स्पर्धा 18 ते 31 जानेवारी दरम्यान होणार असली तरी ऑस्ट्रेलियातील कोरोना परिस्थितीचा आढावा घेतल्याने आता ही स्पर्धा 8 ते 21 फेब्रुवारी दरम्यान घेतली जाण्याची शक्यता वर्तविली जात आहे.









