आयसीसी महिला विश्वचषक स्पर्धेतील अपराजित घोडदौड कायम, विंडीजवर एकतर्फी मात
वेलिंग्टन / वृत्तसंस्था
वर्चस्व गाजवत आलेल्या ऑस्ट्रेलियन महिला संघाने आयसीसी महिला क्रिकेट वनडे विश्वचषक स्पर्धेतील साखळी फेरीत विंडीजचा 7 गडय़ांनी धुव्वा उडवत आपली अपराजित घोडदौड कायम राखली. ऑस्ट्रेलियन महिला संघाचा हा स्पर्धेतील सलग चौथा विजय ठरला. नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करणाऱया विंडीजचा डाव 45.5 षटकात सर्वबाद 131 धावांवर आटोपला तर प्रत्युत्तरात ऑस्ट्रेलियन संघाने 30.2 षटकात 3 बाद 132 धावांसह सहज विजय संपादन केला. 22 धावात 3 बळी घेणारी एलिस पेरी सामन्यातील सर्वोत्तम खेळाडू ठरली.
या स्पर्धेच्या इतिहासातील सर्वात यशस्वी संघ ठरत आलेल्या ऑस्ट्रेलियाने आपला हा लौकिक मंगळवारच्या लढतीतही कायम राखला. सहभागी सर्व संघात ऑस्ट्रेलियाचा संघच पूर्ण बहरात राहिला असून 4 सामन्यात 4 विजयांसह ते गुणतालिकेत अव्वलस्थानी विराजमान आहेत.
मेग लॅनिंगच्या नेतृत्वाखाली ऑस्ट्रेलियन संघ फलंदाजी, गोलंदाजी व क्षेत्ररक्षण या तिन्ही आघाडय़ांवर दर्जेदार कामगिरी साकारली असून 2013 मधील उपजेत्या विंडीज संघाला त्यांच्याविरुद्ध तग धरणे देखील शक्य झाले नाही. प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतल्यानंतर 45.5 षटकात अवघ्या 131 धावांमध्ये डाव गुंडाळला जाणे त्यांच्यासाठी धक्का देणारे ठरले. विंडीजतर्फे कर्णधार स्टेफानी टेलरने 91 चेंडूत 50 धावांची एकाकी खेळी साकारली. तिचे अन्य संघसहकारी मात्र ठरावीक अंतराने बाद होत राहिले.
स्टेफानी टेलर व यष्टीरक्षक-फलंदाज शेमेन कॅम्पबेल (20) यांनी चौथ्या गडय़ासाठी नोंदवलेली 36 धावांची भागीदारी विंडीजच्या डावातील सर्वोत्तम ठरली. हा अपवाद वगळता त्यांना सातत्याने धक्के बसत गेले. एलिस पेरी (3-22) व ऍश्ले गार्डनर (3-25) यांनी एकत्रित 6 बळी घेतले तर जेस्स जोनास्सनने 18 धावात 2 फलंदाजांना बाद केले.
ऑस्ट्रेलियासाठी ‘केक वॉक’
विजयासाठी 132 धावांचे आव्हान हा बलाढय़ ऑस्ट्रेलियासाठी ‘केक वॉक’ होता आणि त्याच थाटात तो त्यांनी पूर्णही केला. सलामीवीर रॅशेल हेन्सने 95 चेंडूत नाबाद 83 धावांची शैलीदार खेळी साकारली आणि येथेच त्यांचा विजय सुनिश्चित झाला. प्रारंभी, ऍलिसा हिली व लॅनिंग स्वस्तात बाद झाले होते आणि ऑस्ट्रेलियाची 2 बाद 7 अशी स्थिती झाली. नंतर 58 धावा फलकावर असताना त्यांना तिसरा बळी गमवावा लागला. पण, हेन्सच्या फटकेबाजीला बेथ मुनीची (नाबाद 28) साथ लाभली आणि या जोडीने 30.2 षटकात सहज विजय संपादन करुन दिला. हेन्री (1-20), हेलेय मॅथ्यूज (1-31), कॉनेल (1-32) यांनी प्रत्येकी 1 गडी बाद केला.
ऑस्ट्रेलियाचा संघ या स्पर्धेत अद्याप अपराजित असून विंडीजला दुसरा पराभव पत्करावा लागला. विंडीजचा संघ 4 सामन्यात 4 गुणांसह गुणतालिकेत पाचव्या स्थानी आहे.
संक्षिप्त धावफलक
विंडीज ः 45.5 षटकात सर्वबाद 131 (स्टेफानी टेलर 50, एलिस पेरी 3-22, ऍश्ले गार्डनर 3-25).
ऑस्ट्रेलिया ः 30.2 षटकात 3 बाद 132 (रॅशेल हेन्स नाबाद 83, बेथ मुनी नाबाद 28. हेन्री 1-20).
कोट्स
यंदाच्या विश्वचषकात स्मृती मानधना व हरमनप्रीत कौर या धोकादायक खेळाडूमुळे भारतीय संघाचे आव्हान तगडे असू शकते. स्मृती व हरमनप्रीत बिग बॅशमध्ये खेळले असल्याने याचा त्यांना निश्चितपणाने लाभ होईल. सर्व सहभागी संघांना भारतापासूनच अधिक दक्ष रहावे लागेल.
-ऑस्ट्रेलियन अष्टपैलू एलिसी पेरी









