भाग-1
‘मॅडम, मी अगदी विटलो आहे. कुण्णा-कुण्णाचे तिच्याशी पटत नाही. घरकामाला एक बाई टिकत नाही. स्वच्छता..स्वच्छता म्हणजे किती स्वच्छता? तिच्या स्वच्छतेच्या निकषात आमचे कोणतेच काम बसत नाही. सारखी कटकट. आता कोरोना आल्यापासून तर काही विचारूच नका. हल्ली तर कहरच झालाय. कंटाळा आलाय साऱयाचा. सारखे हात धुवून धुवून तळहाताची सालं जायची वेळ आली. तरी तिची कृती काही थांबत नाही. सारखी मनात शंका… काय करावं सुचत नाही.’ माझ्याकडे आलेले एक सद्गृहस्थ आपली व्यथा मांडत होते.
मला बालपणी नेहमी कानावर पडणारा शेजारच्या काका काकूंचा संवाद आठवला. काकू काकांबद्दल नेहमी म्हणायच्या, ‘मंत्रचळी माणूस हा. कोणाशीच पटायचं नाही यांचे.’ त्यावेळी आम्हाला फारसे काही कळत नव्हते परंतु काहीतरी वेगळे आहे एवढेच लक्षात यायचे. त्या काकांची तऱहा थोडीशी वेगळी होती. बाहेर पडताना घराला कुलूप लावले आहे ना हे ते वारंवार तपासायचे. समजा घरात कोणत्या तसबिरीला नमस्कार करायचा राहिला असेल तर ते आठवून परत कुलूप काढून आत जायचे. स्कूटर कुठे उभी केली की हँडल नक्की लॉक झाले आहे ना हे अनेकदा तपासून पहायचे यात तास न् तास वाया जायचे. घरातील माणसे पार वैतागून
जायची.
आपल्या आजूबाजूला अशा विचित्र सवयी असणारे किंवा त्या सवयीच्या विळख्यात अडकलेली अनेक माणसे आपण पहात असतो. उगीच डोळे मिचकावणारे, सतत खांदे उडविणारे, केसांवरून हात फिरवणारे, येता-जाता सतत नमस्कार करणारे अशा सवयी असणारी अनेक माणसं पहायला मिळतात. जोपर्यंत अशा सवयीमुळे त्या व्यक्तीचे ‘रुटिन’ विस्कळीत होत नाही किंवा तिच्या प्रगतीमध्ये अडथळे येत नाहीत अथवा इतरांना त्याचा काही त्रास होत नाही तोपर्यंत त्या माणसांच्या या सवयींना महत्त्व दिले जात नाही. काही वेळा दुर्लक्षही केले जाते. मात्र जेव्हा अतिरेक होतो आणि व्यक्तीचे आयुष्य विस्कळीत होऊ लागते तेव्हा मात्र अशा सवयींची दखल घेणे भाग पडते कारण या सवयी, सवयी न राहता मनोविकारांचा भाग बनलेल्या असतात. अशा सवयींच्या मागे मनात सतत काहीतरी विचार घोळत असतो. या विचारामागे तीव्र भीती, चिंता यासारख्या त्रासदायक आणि नकारात्मक भावना दडलेल्या असतात. या सतत घोंगावणाऱया विचारांपासून क्षणिक का होईना परंतु सुटका मिळावी म्हणून ती व्यक्ती ती कृती/सवय पुनः पुन्हा करत असते.
चिंता विकृतीचा एक प्रकार असलेल्या या विकाराला ‘ऑब्सेसिव्ह कंपल्सिव्ह डिसऑर्डर’ (ओसीडी) म्हणतात. चिवट आणि त्रासदायक असलेल्या या विकाराची ओळख वेळीच पटली तर सुरुवातीलाच त्याला लगाम घालण्याच्या दृष्टीने प्रयत्न करता येतात आणि आयुष्यातील वाया जाऊ पाहणारी वर्षे वाचवता येतात.
खरंतर जीवनाची वाटचाल करत असताना प्रत्येकाला कारणपरत्वे भीती, चिंता, ताण इत्यादी भावना थोडय़ाफार प्रमाणात असतातच. परंतु, त्या योग्य प्रमाणात असतात त्यावेळी कोणतेही काम काळजीपूर्वक, अधिक चांगले करण्याची प्रेरणा मिळते परंतु ज्यावेळी नकारात्मक भावना अकारण निर्माण होतात आणि त्याची तीव्रता, वारंवारता आणि कालावधी या गोष्टी वाढू लागतात, टोकाला जातात त्यावेळी मनोविकारांच्या दिशेने वाटचाल सुरू होते. भित्रा स्वभाव, काळजीखोरपणा, मनात सतत येणाऱया शंका-कुशंका, न्यूनगंड, अति भोळसटपणा, दुबळी निर्णय क्षमता या गोष्टी ‘ओसीडी’ विकाराला खतपाणी घालतात.
खरंतर तर गॅस किंवा पंखा आपण नीट बंद केला आहे की नाही, पंपाचे बटण नीट बंद केले आहे ना असे संभ्रम कधी ना कधी आपल्या सगळय़ांनाच होत असतात. कित्येकदा आपणही कुलूप लावल्यानंतर ते नीट लागले आहे ना याची खात्री करण्यासाठी ते ओढून पाहतो. परंतु ते एकदा तपासल्यानंतर किंवा एकदा तशा पद्धतीची खात्री केल्यानंतर तो विचार मनातून निघूनही जातो. परंतु अशा त्रासाने ग्रस्त व्यक्तीच्या मनात मात्र ते इतके रुतून बसलेले असते की ती व्यक्ती त्या विचारांच्या आवर्तात फिरत राहते आणि अस्वस्थ होते.
उदा. एखाद्या व्यक्तीला बक्षीस म्हणून पाकिटामधून पैसे दिले. पाकीट दिले तर खरे परंतु ते नीट चिकटवले होते ना? त्यातले पैसे पडले तर नसतील ना? अमुक एखाद्या व्यक्तीला चेक दिला आहे पण चेक क्रॉस करायचा तर राहिला नाही ना? घराला कुलूप घातले खरे पण नीट लागले असेल का अशी संदिग्धता वेगवेगळय़ा बाबतीत या विकारातील लोकांना छळत राहते. आपण स्वतः केलेल्या गोष्टीबाबत साशंकता वाटत राहिल्याने त्यांचा आत्मविश्वास आणि आनंदही हरवतो. ओसीडीमधील ऑब्सेसिव्ह आणि कंपल्सिव्ह या दोन संज्ञा महत्त्वाच्या आहेत. अनाहूतपणे मनात शिरणाऱया व मन व्यापून टाकणाऱया विचार किंवा आवेगांना किंवा पुनः पुन्हा डोळय़ासमोर निर्माण होणाऱया त्रासदायक प्रतिमांना अनिवार्य विचार किंवा ऑब्सेशन म्हणतात. मनात येणारे हे विचार कितीही नकोसे वाटले तरी विकारग्रस्त व्यक्तीला त्याकडे दुर्लक्ष करता येत नाही. विचारांमुळे व्यक्तीच्या मनात चिंता, भीती, अस्वस्थता, व्याकुळता वगैरे नकारात्मक भावना निर्माण होतात आणि काहीतरी अप्रिय प्रसंग किंवा परिस्थिती उद्भवेल की काय अशी धास्ती त्यांच्या मनात घर करते. आपले विचार व कृती अवास्तव आहे हे बाधित व्यक्तीला कळत असते पण त्यावर अंकुश ठेवणे किंवा त्याकडे दुर्लक्ष करणे तिला जमत नाही. ती व्यक्ती दुःखी होते, ते विचार दडपण्यासाठी ती दुसरा विचार किंवा क्रिया करत राहते.
एखाद्या रिवाजाप्रमाणे पुनः पुन्हा केल्या जाणाऱया या क्रियांना म्हणजेच अनिवार्य कृतींना कंपल्सिव्ह म्हणतात. त्रस्त व्यक्तीच्या मनात असलेले विचार आणि त्या विचारांचा त्रास कमी होण्यासाठी ती पुनः पुन्हा करत असलेली कृती याचा अर्थाअर्थी संबंध नसतो. अनिवार्य विचार हे अनेक विषयासंबंधीचे असू शकतात. अनेकदा विकाराच्या सुरुवातीला ते फारसे स्पष्ट नसतात. एखाद्या घटनेमुळे वा संदिग्ध विचारांमुळे मनात आधी गोंधळ निर्माण होतो आणि मग ताण निर्माण होऊन त्या व्यक्तीचे आयुष्य सामान्य (नॉर्मल) नसल्यासारखे वाटते. अर्थात या विषयाची व्याप्ती मोठी असल्याने एकाच लेखामधे हे मांडणे शक्मय नाही. त्यामुळे ओसीडीविषयी अधिक जाणून घेऊया पुढच्या लेखात.
-ऍड. सुमेधा देसाई








