विद्यार्थ्यांच्या ऑनलाईन शिक्षणासाठी शिक्षकांसाठी राबवले ऑनलाईन प्रशिक्षण वर्ग
- जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्था, तंत्रनिकेतन मालवणचा संयुक्त उपक्रम
- अशा प्रकारचा उपक्रम राबविणारी सिंधुदुर्ग डाएट राज्यातील पहिली संस्था
दत्तप्रसाद वालावलकर / ओरोस:
सिंधुदुर्ग जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्थेने पारंपरिक अभ्यासवर्ग पद्धतीला पर्याय उपलब्ध करून देत टेक्नोसेवी शिक्षक घडविण्याचे काम हाती घेतले आहे. तंत्रनिकेतन मालवणच्या संयुक्त विद्यमाने जिल्हय़ातील प्राथमिक ते उच्च माध्यमिकपर्यंतच्या सुमारे दोन हजार शिक्षकांना ऑनलाईन अभ्यासवर्गाचे प्रशिक्षण देण्यात आले आहे. अशा प्रकारचा उपक्रम राबविणारा सिंधुदुर्ग हा राज्यातील पहिला जिल्हा ठरला आहे.
डी. एड बेरोजगारांची संख्या दरवर्षी वाढत जात असल्याने मागील काही वर्षांपासून विद्यार्थ्यांनी डी. एड शिक्षण प्रवेशाकडे पाठ फिरवली आहे. सिंधुदुर्गनगरी येथील जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्था (डाएट) ही सुद्धा याला अपवाद नाही. ज्ञानदान केल्याशिवाय दिवस संपणे, ही पद्धत न रुचणाऱया या डाएट कॉलेजच्या प्राचार्य पी. ए. जाधव यांनी शिक्षकांना ऑनलाईन प्रशिक्षण देण्याबाबतचा प्रस्ताव तयार करून तो प्रत्यक्षात आणला आहे. मालवण तंत्रनिकेतनचे यासाठी मोठे योगदान असल्याची माहिती त्यांनी ‘तरुण भारत’शी बोलताना दिली.
आधुनिक तंत्रज्ञानाचा प्रभावी वापर
अध्ययन, अध्यापन प्रक्रियेत आधुनिक तंत्रज्ञानाचा प्रभावी वापर या शीर्षकाखाली ऑनलाईन प्रशिक्षणासाठी देण्यात आलेल्या लिंकवर अनेक शिक्षकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद देत नावे नोंदवली आणि या वर्गाची आतापर्यंत दोन शिबिरे झाली, तर तिसऱया सत्रासाठी अनेक शिक्षक प्रतीक्षा यादीवर आहेत. व्हीडिओवर आधारित असाईनमेंट क्वीझ रोजच्या रोज पूर्ण करणे तसेच सात दिवसांचे प्रशिक्षण संपल्यानंतर संबंधित प्रशिक्षणार्थींची परीक्षाही घेण्यात आली. लॅपटॉप अथवा संगणकाचा अभाव, नेटवर्क प्रॉब्लेम, कोरोना डय़ुटी, इतर शैक्षणिक कामकाज इत्यादी सांगड घालून अनेक शिक्षक हे प्रशिक्षण प्रमाणपत्र मिळविण्यास पात्र ठरले.
1840 शिक्षकांचा सहभाग
15 ते 20 जुलै या कालावधीत 616 शिक्षकांनी, तर 28 जुलै ते 3 ऑगस्ट या कालावधीत 1144 अशा एकूण 1840 शिक्षकांनी या प्रशिक्षणात सहभाग नोंदवला. तिसऱया बॅचसाठी 407 शिक्षक प्रतीक्षा यादीवर आहेत. या व्यतिरिक्त गणित शिक्षकांसाठी ‘Maths Geo Zebra’ हे विशेष प्रशिक्षणही देण्यात आले. 12 ते 14 ऑगस्ट या कालावधीत 353, तर 15 ते 17 सप्टेंबर या कालावधीत 106 अशा एकूण 459 शिक्षकांना हे प्रशिक्षण देण्यात आले. ‘हॅन्डस् ऑन मॅथेमॅटिक्स विथ जीओ जेब्रा’ या प्रशिक्षणात सिंधुदुर्गबरोबरच अन्य जिल्हय़ातील शिक्षकही सहभागी झाले होते.
188 शिक्षकांना यशस्वीता प्रमाणपत्र
जिल्हय़ातील पात्र ठरलेल्या 188 शिक्षकांना यशस्वीता प्रमाणपत्र वितरीत करण्यात आले. या प्रशिक्षणासाठी शिरगाव हायस्कूलचे शिक्षक शमसुद्दीन अत्तार आणि कुडाळ हायस्कूलचे शिक्षक योगानंद सावंत यांनी बहुमोल सहकार्य केले. यासाठी डाएटच्या श्रीमती तौशीकर यांनी समन्वयक म्हणून काम केले.
बालकांचे हक्क आणि सुरक्षितता
बालकांचे हक्क आणि सुरक्षितता याबाबतचा कायदा मुलांना माहित असावा, यासाठी आता जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्थेमार्फत पहिली ते बारावीपर्यंतच्या सर्व शाळांमधील प्रत्येकी एका शिक्षकाला याबाबतचे प्रशिक्षण दिले जाणार आहे. वडिलांव्यतिरिक्त जे घटक आपले संरक्षण करू शकतात, त्याबाबतची माहिती या माध्यमातून लहान वयातच मुलांपर्यंत पोहोचवली जाणार आहे.
सायबर क्राईमची माहिती देणार
‘सायबर क्राईम’ हा एक गुन्हा आहे, हेच विद्यार्थ्यांना माहित नाही. त्यामुळे कळत नकळत त्यांच्याकडून अशा प्रकारचे गुन्हे घडू शकतात. त्यामुळे सायबर क्राईम म्हणजे काय, या अंतर्गत येऊ शकणारे गुन्हे, त्यासाठीची शिक्षा, याबाबतची माहिती शाळेतील विद्यार्थ्यांना दिली जाणार आहे. त्यांच्याकडून अशा प्रकारचे गुन्हे घडू नयेत, यासाठीचे शिक्षण शाळांमधूनच दिले जाता येणार आहे. विद्यार्थ्यांमार्फत याबाबत जागृती होणे आवश्यक असल्याचे मत यावेळी प्राचार्य जाधव यांनी व्यक्त केले. ऑनलाईन प्रशिक्षणासाठी गुगल मीटचा वापर केला जाणार आहे.
960 शिक्षकांना प्रमाणपत्रांचे वितरण
अध्ययन व अध्यापन प्रक्रियेत आधुनिक तंत्रज्ञानाचा प्रभावी वापर या प्रशिक्षणात सहभागी झालेल्या 1840 पैकी 960 शिक्षकांना प्रमाणपत्र वितरीत करण्यात आले. यासाठी डाएटचे शशिकांत शिंदे यांनी समन्वयक म्हणून काम केले. ऑनलाईन अभ्यास होतो. मात्र ऑनलाईनसाठीची साधने वापरण्याचे प्रमाण फारच कमी असल्याची खंत प्राचार्य जाधव यांनी व्यक्त केली. आत्ताच्या जगात अपडेट राहणे आवश्यक आहे. त्यामुळे शिक्षकांनी लॅपटॉप, संगणक याबाबतीत सजग राहावे, असे आवाहनही त्यांनी केले आहे.









