बेळगावच्या तरुणाची ट्वीटद्वारे मागणी
प्रतिनिधी / बेळगाव
बेळगावमध्ये कोरोना रुग्णांना ऑक्सिजनची आवश्यकता भासत आहे. यातच प्रशासनाने स्वयंसेवी संस्थांना ऑक्सिजन देण्यास मनाई केली आहे. यामुळे ऑक्सिजन अभावी रुग्णांचे हाल होत आहेत. त्यामुळे आम्हाला ऑक्सिजन उपलब्ध करून द्या, अशी मागणी बेळगावच्या तरुणाने ट्वीटच्या माध्यमातून अभिनेता सोनू सूद यांच्याकडे केली आहे.
बेळगावमध्ये कोरोना रुग्णांच्या संख्येत दररोज मोठय़ा प्रमाणात वाढ होत आहे. त्यामानाने हॉस्पिटल्समध्ये बेड्स उपलब्ध नसल्याने समस्या निर्माण झाल्या आहेत. त्यासाठी महाराष्ट्र एकीकरण समितीच्या माध्यमातून मराठा मंदिर येथे आयसोलेशन केंद्र सुरू करण्यात आले आहे. परंतु ऑक्सिजन नसल्याने या रुग्णांना व त्यांच्या कुटुंबीयांना धावपळ करावी लागत आहे. स्थानिक प्रशासन याकडे दुर्लक्ष करीत असून स्वयंसेवी संस्थांवरही निर्बंध असल्याने अभिनेता सोनू सूद यांच्याकडे ऑक्सिजन पुरविण्याची मागणी संकेत जाधव यांनी ट्वीटद्वारे केली.
कोण आहे अभिनेता सोनू सुद?
अनेक हिंदी चित्रपटातून खलनायकाची भूमिका करणारे सोनू सुद खऱया आयुष्यात रियल हिरो आहेत. त्यांनी मागीलवर्षी हजारो मजुरांना त्यांच्या गावापर्यंत पोहोचविले आहे. तसेच मजुरांच्या मुलांच्या शिक्षणासाठी, रुग्णांसाठी लाखो रुपयांची मदत केली आहे. ज्या ठिकाणी ऑक्सिजनची आवश्यता आहे, त्या ठिकाणी पोहोचविले आहे. त्यामुळे अभिनेता सोनू सूद यांच्या कार्याची महती सर्वत्र पसरली आहे.








