पाणीपुरवठा ठप्प असल्याने घागर मोर्चा काढून प्रशासनाच्या कारभाराबद्दल नाराजी : पाण्यासाठी भटकंती करण्याची नागरिकांवर वेळ

प्रतिनिधी /बेळगाव
शहरात पाणीपुरवठा करणाऱया कामगारांचे वेतन वेळेत देण्यात आले नाही. 354 कामगारांना सेवेत कायम करा, या मागणीसाठी आंदोलन छेडण्यात आल्याने शहरवासियांचा पाणीपुरवठा बंद झाला आहे. त्यामुळे याचा फटका शहरवासियांना बसला आहे. ऐन गणेशोत्सव सणातच शहरवासियांना पाण्यासाठी भटकंती करण्याची वेळ आली आहे. त्यामुळे संताप व्यक्त करण्यात येत आहे.
महापालिकेच्यावतीने शहरात पाणीपुरवठा केला जात होता. त्यानंतर प्रायोगिक तत्त्वावर 24 तास पाणीपुरवठा योजना राबविण्यासाठी पाणीपुरवठा मंडळाकडे पाणीपुरवठा नियोजनाचा कारभार सोपविण्यात आला होता. आता संपूर्ण शहरात 24 तास पाणीपुरवठा योजना राबविण्यासाठी एल ऍण्ड टी कंपनीकडे कारभार हस्तांतर करण्यात आला आहे. तरीदेखील पाणीपुरवठा विभागात 20 ते 25 वर्षे सेवा बजावूनही कर्मचाऱयांना सेवेत कायम करण्यात आले नाही.
राकसकोप जलाशय आणि हिडकल जलाशयाच्या पाणीपुरवठय़ासह लक्ष्मीटेकडी जलशुद्धीकरण केंद्र आणि वितरण व्यवस्था पूर्णपणे बंद ठेवून कामगारांनी आंदोलन छेडले. त्यामुळे शहरवासियांना ऐन सणात पाणी समस्येला तोंड द्यावे लागत आहे. सणासुदीत पाणी नसल्याने शहरवासियांचे हाल होत असून पाण्यासाठी भटकंती करण्याची वेळ आली आहे. त्यामुळे शहरात संताप व्यक्त करण्यात येत आहे. याबाबत नागरिकांनी पाणीपुरवठा मंडळाकडे असंख्य तक्रारी करून पाणीपुरवठा सुरळीत करा, अशी मागणी केली होती.
हुतात्मा चौकात निदर्शने
पाणी नसल्यामुळे शुक्रवारी सकाळी शहरातील महिलांनी हुतात्मा चौकात निदर्शने केली. पाणीपुरवठा करणाऱया कामगारांचे वेतन वेळेत देण्यात आले नसल्याने कामगारांनी आंदोलन छेडले आहे. त्यामुळे पाणी समस्या निर्माण होण्यास एल ऍण्ड टी कंपनीचे अधिकारी जबाबदार असल्याचा आरोप करण्यात आला. पाणी नसल्याने घागर मोर्चा काढून प्रशासनाच्या कारभाराबद्दल नाराजी व्यक्त केली. सुरळीत पाणीपुरवठा करा अन्यथा संपूर्ण शहरवासीय रस्त्यावर येऊ, असा इशारा दिला आहे.
यावेळी एल ऍण्ड टी कंपनीच्या अधिकाऱयांशी संपर्क साधला असता दुपारनंतर पाणीपुरवठा सुरळीत करण्यात येईल, असे सांगण्यात आल्याने नागरिकांनी आंदोलन मागे घेतले. मात्र रात्री उशिरापर्यंत शहरात पाणीपुरवठा झालाच नाही.
कामगारांच्या आंदोलनाचा विषय लपवून जलवाहिनीच्या दुरुस्तीचे कारण पुढे…
एल ऍण्ड टीकडे वर्ग करण्यात आल्याने कामगारांच्या पगारात कपात करण्यात येत आहे. तसेच कामगारांना वेळेत पगार दिला जात नाही. त्यामुळे एल ऍण्ड टी कंपनीकडे वर्ग करण्यात आलेल्या पाणीपुरवठा करणाऱया कामगारांनी तसेच बिल कलेक्टरनी धरणे आंदोलन छेडले आहे. सदर आंदोलन गेल्या चार दिवसांपासून छेडले असून शहराचा पाणीपुरवठा पूर्णपणे बंद आहे. मात्र एल ऍण्ड टी कंपनीने कामगारांच्या आंदोलनाचा विषय लपवून ठेवून जलवाहिनीच्या दुरुस्तीचे काम सुरू असल्याने पाणीपुरवठा बंद असल्याचे पत्रक प्रसिद्ध केले होते. वास्तविक कामगारांच्या आंदोलनामुळे शहराचा पाणीपुरवठा तीन दिवसांपासून बंद आहे.









