लोणावळा येथून चौकशी करुन पथक परतले : उद्योगपतींच्या चौकशीसाठी क्वॉरंटाईन कक्षात प्रवेश नाकारला : ईडी, सीबीआयचा फेरा लागणार?
प्रतिनिधी / महाबळेश्वर
पांचगणी येथे इन्स्टिटय़ुट क्वारंटाईन केलेले एस बँक घोटाळय़ातील आरोपी प्रसिध्द उद्योगपती वाधवान बंधुची चौकशी करण्यासाठी महाबळेश्वर पोलीस निरीक्षक बी. ए. कोंडुभैरी यांच्या नेतृत्वाखाली पोलिसांचे एक पथक नुकतेच लोणावळा येथुन परत आले असुन या प्रकरणाच्या चौकशीची एक फेरी पूर्ण झाल्याचे समजते. दरम्यान, वाधवान यांच्या चौकशीसाठी जिल्हय़ाबाहेरील पथकाला क्वारंटाईन कक्षात प्रवेश नाकारण्यात आल्याने या पथकाला चौकशीसाठी 23 एप्रिलची प्रतिक्षा करावी लागणार आहे.
गृहविभागाचे सचिवांच्या पत्राचा आधार घेवुन एस बँक घोटाळय़ातील उद्योगपती वाधवान यांनी आपले कुटूंब व नोकर, चाकर अशा 23 जणासह लोणावळा ते महाबळेश्वर असा प्रवास केला. हा 200 किलोमीटरचा प्रवास करताना त्यांनी जिल्हाबंदी आदेशाचे उल्लंघन केले. त्यामुळे प्रांताधिकाऱयांनी केलेल्या फिर्यादीवरून उद्योगपती कपिल वाधवान यांच्यावर महाबळेश्वर पोलीस ठाण्यात विविध कलमाखाली गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. दरम्यान, जिल्हाबंदीचे उल्लंघन केल्याने वाधवान बंधु यांच्यासह 23 जणांना पांचगणी येथे इन्स्टिटय़ुशन क्वारंटाईन सेंटरमध्ये दाखल करण्यात आले. महाबळेश्वर पोलीस ठाण्यात दाखल असलेल्या गुन्हय़ाच्या तपासासाठी महाबळेश्वरचे पोलीस निरीक्षक बी. ए. कोंडुभैरी यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिसांचे एक पथक वाधवान बंधु हे लोणावाळय़ाच्या ज्या भागात राहिलेले त्या भागात चौकशी करून नुकतेच परत आले.
वाधवान बंधु यांनी प्रवासासाठी गृहविभागाचे सचिव अमिताभ गुप्ता यांचे खास पत्र घेतले होते. तेच पत्र त्यांनी अनेक ठिकाणी दाखविले. लोणावळय़ाच्या बाहेर पडताना 8 एप्रिल रोजी सायंकाळी प्रथम लोणावळा पोलिसांच्या नाकेबंदीत वाधवान उद्योगपतीस अडविण्यात आले. त्या ठिकाणी प्रधान सचिव यांचे पत्र दाखविले. त्यामुळे लोणावळा पोलिसांनी वाधवान यांच्या पाच गाडय़ा सोडल्या. त्यानंतर या उद्योगपतीस एक्सप्रेस हायवेच्या लोणावळय़ातील टोलनाक्यावर व पुण्याजवळील टोल नाक्यावर अडविण्यात आले. त्या ठिकाणीही त्यांनी हेच पत्र दाखविले. त्यानंतर खेडशिवापुर टोल नाक्यावर वाधवान यांच्या गाडय़ा अडविण्यात आल्या. त्या ठिकाणीही वाधवान यांनी गुप्ता यांचे पत्र दाखविले. तेथुन वाधवान यांच्या गाडय़ांचा ताफा हा सारोळे येथे सातारा जिल्हय़ाच्या हद्दीवर आले तेथे जिल्हय़ात प्रवेश देण्यापुर्वी पोलिसांनी चौकशी केली. त्या ठिकाणीही पोलिसांना वाधवान यांनी गृह विभागाचे प्रधान सचिव यांचे ते पत्र दाखविले. गुप्ता यांचे पत्र पाहताच पोलीस अधिक चौकशी न करता वाधवान यांच्या वाहनांना सोडत होते. सारोळे नंतरच्या प्रवासात वाधवान यांना फारशा अडचणी आल्या नाहीत.
महाबळेश्वर पोलीस पथकाने प्रथम वाधवान यांची चौकशी केली. त्यानंतर ज्या ज्या ठिकाणी वाधवान यांच्या गाडय़ा अडविण्यात आल्या. त्या त्या ठिकाणी असलेल्या कर्मचाऱयांची चौकशी महाबळेश्वर पोलिसांनी केली. त्यानंतर महाबळेश्वर येथील तपास पथक लोणावळय़ा जवळील तुंगार्ली येथे पोहचले. याच विभागातील पीकॉक व्हॅली या सोसायटीत पोहचले. याच सोसायटीतील दोन बंगले वाधवान यांनी भाडय़ाने घेतले होते. हे दोन्ही बंगले मुंबईच्या एका धनिकाचे असुन ते भाडय़ाने दिले जातात. यासाठी लोणावळय़ात एका दलालाची नेमणूक करण्यात आली आहे. याच दलालाच्या मार्फत वाधवान यांनी 20 मार्च रोजी हे बंगले भाडय़ाने घेतले होते. या बंगल्यांची देखभाल करण्यासाठी धनिकाने एका केअर टेकरची नेमणूक केली असून तो दलाल आणि हा केअर टेकर यांची चौकशी महाबळेश्वरच्या पोलीस पथकाने केल्याचे समजते.
इन्स्टिटय़ुशन क्वारंटाईनचा कालावधी संपुष्टात आल्यानंतर वाधवान कुटूंबाच्या मागे अनेक चौकाशी पथकांचा ससेमिरा लागणार आहे. कदाचित ईडी अथवा सीबीआय बँक घोटाळय़ातील चौकशीसाठी वाधवान बंधु यांना ताब्यात घेण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे क्वारंटाईनचा कालावधीनंतर वाधवान बंधु यांचा पुढील मुक्काम हा दिल्ली असु शकतो अशी चर्चा येथे सुरू आहे.
लोणावळा सोडल्याची माहिती लपवली
वाधवान उद्योगपती हे 20 मार्च रोजी लोणावळय़ा जवळील तुंगार्ली येथे राहण्यासाठी आले तेव्हा त्यांची नोंद पालिका प्रशासनाने केली होती. परंतु 8 एप्रिल रोजी लोणावळा सोडताना उद्योगपतीने पालिका प्रशासनाला काहीही माहिती दिली नसल्याचे चौकशीतुन उघडकीस आले आहे.