नवी दिल्ली / वृत्तसंस्था
हिंडेनबर्ग अहवालानंतर अदानी उद्योगसमूहाच्या समभागांची घसरण शेअरबाजारांमध्ये झाली असली, तरी भारताची सर्वात मोठी विमा कंपनी एलआयसीने या समूहावरील आपला विश्वास कायम ठेवला आहे. या कंपनीने अदानी समूहामध्ये आपली हिस्सेदारी वाढविण्याचा निर्णय घेतला आहे.
गेल्या काही दिवसांमध्ये एलआयसीने अदानी उद्योगसमूहाचे 3.57 लाख समभाग खरेदी केले आहेत. सध्या अदानी समूहाचे समभाग काही महिन्यांपूर्वी असणाऱया भावांपेक्षा निम्म्या दराला मिळत आहेत. याचा लाभ उठविण्याचा प्रयत्न एलआयसीने केला आहे, असे काही तज्ञांचे मत आहे. तर एलआयसीने धोका पत्करला आहे, असेही मानणारे काही तज्ञा आहेत. एलआयसीच्या या नव्या खरेदीमुळे अदानी समूहातील या कंपनीची हिस्सेदारी वाढून 4.26 टक्के झाली आहे. गेल्या डिसेंबर महिन्यात ती 4.23 टक्के होती, अशी माहिती देण्यात आली.
अदानी एंटरप्रायझेस, अदानी ट्रान्समिशन, अदानी ग्रीन आणि अदानी टोटल गॅस आदी कंपन्यांमध्ये एलआयसीने आपली हिस्सेदारी वाढविली आहे. मात्र, अदानी पोर्टस्, एसीसी आणि अंबुजा सिमेंटस् या तीन अदानी कंपन्यांमधील हिस्सेदारी एलआयसीने कमी केली आहे. या उद्योगसमूहात एलआयसीची गुंतवणूक जानेवारी 2023 मध्ये जवळपास 30,127 कोटी रुपये होती. याचवेळी विरोधी पक्षांनी केंद्र सरकारवर टीका केली होती. एलआयसीमध्ये जमा असणारा लोकांचा पैसा केंद्र सरकार अदानींना वाचविण्यासाठी उपयोगात आणत आहे, असा विरोधकांचा आरोप होता. तथापि, त्याकडे दुर्लक्ष करुन एलआयसीने हिस्सेदारी वाढविण्याचा महत्वपूर्ण निर्णय घेतला असल्याची माहिती देण्यात आली आहे.
शरद पवारांचे पाठबळ
काही दिवसांपूर्वी राष्ट्रवादी काँगेसचे ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी अदानी गटाला सहानुभूती देणारी विधाने केली होती. अदानींची चौकशी संयुक्त संसदीय समितीच्या माध्यमातून केल्याने काहीही साध्य होणार नाही, असे मतप्रदर्शनही पवार यांनी केले होते. त्यामुळे विरोधी पक्षांच्या आरोपांमधला निरर्थकपणा दिसून आला होता. तसेच अदानोनाही पाठबळ मिळाले होते.









