मुंबई/प्रतिनिधी
मुंबई क्रूझ ड्रग्ज प्रकरणात राज्याचे अल्पसंख्याक मंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते नवाब टप्प्याटप्प्याने धक्कादायक खुलासे आणि माहिती उघड करत आहेत. आज रविवारी पुन्हा मलिक आणखी एक मोठा गौप्यस्फोट करणार आहेत. रविवारी हॉटेल ललितमध्ये अनेक रहस्य आहेत आणि ती समोर आणणार असल्याचे नवाब मलिक यांनी म्हटले होते. त्याबाबत त्यांनी ट्वीट करुन माहिती दिली होती. मात्र मंत्री नवाब मलिक यांनी आर्यन खान प्रकरणात आणखी एक गौप्यस्फोट केला आहे. मलिक आज सकाळी 10 वाजता पत्रकार परिषद घेणार आहेत. मात्र, त्याआधीच त्यांनी एक ऑडिओ क्लिप ट्वीट केली आहे. यामध्ये एनसीबीचे अधिकारी व्हीव्ही सिंग आणि सॅम डिसूझा यांच्यातील संभाषण आहे, असा दावा मलिक यांनी केलाय. या संभाषणात सॅम या अधिकाऱ्याला भेटण्याचा दिवस ठरवत आहे.
मंत्री नवाब मलिक यांनी सतत काही ना काही खुलासे करण्याचा सपाटाच सध्या लावलेला आहे. सूचक असे ट्विट करुन त्यानंतर काही वेळातच पत्रकार परिषद घेत ते नवनवे आरोप करत आहेत. एनसीबीचे विभागीय संचालक समीर वानखेडे यांच्यावर त्यांनी वारंवार आरोप करत त्यांनी बनावट प्रमाणपत्रांद्वारो नोकरी मिळवल्याचे म्हटले आहे. त्यानंतर रविवारी हॉटेल ललितमधील माहिती समोर आणणार असल्याचे नवाब मलिक यांनी याआधी म्हटले होते. त्यानंतर आता नवाब मलिक कोणता नवा खुलासा करणार याकडे आता महाराष्ट्राच्या जनतेचं लक्ष लागलेलं आहे.