लेखी परीक्षेत उत्तीर्ण : आता ‘क्षमता’ चाचण्यांचे आव्हान : केवळ 19 जणींची प्रशिक्षणासाठी निवड होणार
नवी दिल्ली / वृत्तसंस्था
एनडीएमध्ये (राष्ट्रीय संरक्षण प्रबोधिनी) प्रवेशासाठी मुलींचा मार्ग मोकळा झाल्यानंतर पहिल्याच संधीमध्ये मुलींनी आपली क्षमता सिद्ध केली आहे. 14 नोव्हेंबरला झालेल्या सीडीएस लेखी परीक्षेत तब्बल 1,002 मुली उत्तीर्ण झाल्या आहेत. या सर्व उत्तीर्ण विद्यार्थिनींना आता बौद्धिक, शारीरिक आणि मानसिक क्षमतेच्या चाचण्या द्याव्या लागणार आहेत. या कठोर चाचण्यांमधून केवळ 19 जणींना एनडीएमध्ये प्रशिक्षण घेण्याची संधी मिळणार आहे.
सर्वोच्च न्यायालयाने 18 ऑगस्ट रोजी दिलेल्या एका निकालानंतर महिलांना एनडीएचे दरवाजे खुले झाले होते. एनडीएमध्ये महिलांना प्रवेश नाकारणे ही लिंगभेद करणारी गोष्ट आहे असे सांगत न्यायालयाने हा ऐतिहासिक निकाल दिला होता. त्यानंतर केंद्र सरकारने तयारीसाठी किमान या वर्षाची सवलत मिळावी अशी विनंती केली होती. मात्र, ही विनंती मान्य न करता तातडीने मुलींना सामावून घेण्याच्यादृष्टीने प्रक्रिया सुरू करण्याचे निर्देश न्यायालयाने दिले होते.
आजवर महिला अधिकाऱयांना चेन्नईमधील ऑफिसर्स टेनिंग ऍकॅडमीमधून प्रशिक्षण घेता येत असे. मात्र आता एनडीएमधील प्रवेशाचा मार्गही मोकळा झाला आहे. देशभरातून 1 लाख 77 हजार 654 मुलींनी ही लेखी परीक्षा दिली होती. 14 नोव्हेंबरला ही परीक्षा आयोजित करण्यात आली होती. राज्यसभेत सादर करण्यात आलेल्या आकडेवारीनुसार या परीक्षेला 5 लाख 75 हजार 856 एवढे विद्यार्थी बसले होते. त्यापैकी 1 लाख 77 हजार 654 एवढय़ा मुली होत्या. लेखी परीक्षा उत्तीर्ण झालेल्या मुलींची आता ‘एसएसबी’ म्हणजेच सर्व्हिस सिलेक्शन बोर्डद्वारे पुढील प्रक्रिया पार पडेल. त्यानुसार मुलाखत आणि वैद्यकीय चाचण्या होणार आहेत. त्यानुसार 1,002 मुलींपैकी 19 जणींची एनडीएमध्ये निवड केली जाणार आहे.
एनडीएची परीक्षा वर्षातून दोन वेळा होते. 2022 म्हणजे पुढच्या वषी मे पर्यंत एनडीएच्या प्रवेश परीक्षेत महिलांनाही संधी देणारी सर्व प्रक्रिया पूर्ण होणार आहे. त्यानुसारच सध्या प्रवेश प्रक्रिया सुरु आहे. एनडीएमध्ये महिलांची पहिली बॅच 2023 पासून सुरु होणार आहे. देशाच्या सर्वोच्च न्यायालयात याबाबत दिलेल्या प्रतिज्ञापत्रात केंद्र सरकारने ही बाब स्पष्ट केली होती.
तीन वर्षांचे कठोर प्रशिक्षण
एनडीएची परीक्षा उत्तीर्ण झाल्यानंतर महिला लष्कर, हवाई दल आणि नौदलात अधिकारी म्हणून सहभागी होऊ शकतील. त्यापूर्वी त्यांना एनडीए अकादमीमध्ये तीन वर्षांचे कठोर प्रशिक्षण घ्यावे लागणार आहे. एका वर्षानंतर पर्यायानुसार डेहराडूनस्थित इंडियन मिलिटरी अकादमी (आयएमए), वायुसेनेसाठी डुंडीगुल (हैदराबाद) तर नौदलासाठी इझेमला (केरळ) येथील अकादमीमध्ये प्रशिक्षण द्यावे लागेल. एकूण चार वर्षांच्या कठोर प्रशिक्षणानंतर महिला सैन्यदलात सामील होऊ शकतील.









