वृत्तसंस्था/ पॅरीस
सोमवारी घोषित करण्यात आलेल्या एटीपीच्या ताज्या मानांकन यादीत सर्बियाच्या टॉप सीडेड जोकोविचने आपले आघाडीचे स्थान कायम राखले आहे. नुकत्याच झालेल्या ऑस्ट्रेलियन ग्रॅण्ड स्लॅम स्पर्धेत कोरोना समस्येमुळे जोकोविचने आपला सहभाग दर्शविला नाही. या स्पर्धेत स्पेनच्या नदालने विजेतेपद मिळवून विक्रमी 21 वे ग्रॅण्ड स्लॅम अजिंक्यपद मिळविले. या ताज्या मानांकन यादीत नदाल पाचव्या स्थानावर असून स्वीसचा रॉजर फेडरर 30 व्या स्थानावर आहे.
सर्बियाच्या जोकोविचने एटीपीच्या मानांकनात 358 आठवडे आपले अग्रस्थान राखले आहे. दरम्यान 20 ग्रॅण्डस्लॅम अजिंक्यपदे मिळविणाऱया स्वीसच्या रॉजर फेडररला एटीपीच्या मानांकनात तब्बल 21 वर्षांनंतर 30 व्या स्थानावर समाधान मानावे लागत आहे. फेडररने 1665 गुणांसह 30 वे स्थान मिळविले आहे. ऑस्ट्रेलियन ग्रॅण्डस्लॅम स्पर्धेत तो सहभागी होवू शकला नाही. त्यामुळे त्याच्या मानांकनात 13 अंकांनी घसरण झाली.
एटीपीच्या ताज्या मानांकन यादीत जोकोविच 11015 गुणांसह पहिल्या, रशियाचा मेदव्हेदेव 10125 गुणांसह दुसऱया, जर्मनीचा व्हेरेव्ह 7780 गुणांसह तिसऱया, ग्रीकचा सित्सिपस 7170 गुणांसह चौथ्या, स्पेनचा नदाल 6875 गुणांसह पाचव्या, इटलीचा बेरेटेनी 5279 गुणांसह सहाव्या, रशियाचा रूबलेव्ह 4829 गुणांसह सातव्या, नॉर्वेचा कास्पर रूड 4065 गुणांसह आठव्या, कॅनडाचा ऍलियासिमे 3923 गुणांसह नवव्या आणि इटलीचा सिनर 3705 गुणांसह दहाव्या स्थानावर आहे.









