क्रीडा प्रतिनिधी / मडगाव
सामन्याच्या 85व्या मिनिटाला रॉय कृष्णाने पेनल्टीवर केलेल्या गोलमुळे एटीके मोहन बागान संघाने एफसी गोवाचा पराभव केला आणि विजयाचे पूर्ण तीन गुण वसूल केले. एटीकेचा हा सहाव्या सामन्यातील चौथा विजय ठरला. त्यांचे आता सहा सामन्यांतून 13 गुण झाले आहेत. सहाव्या सामन्यांतून एफसी गोवाचा हा स्पर्धेतील दुसरा पराभव होता. त्यांचे आता दोन विजय आणि दोन बरोबरीने 8 गुण झाले आहेत. या सामन्यातील सामनावीर पुरस्कार एटीकेच्या कार्ल मॅकहय़ुजला मिळाला.
पहिल्या सत्रातील तीस मिनिटांच्या खेळावर एटीके मोहन बागान संघाचे वर्चस्व होते. सामन्याच्या दुसऱयाच मीनटाला एटीकेने धोकादायक चाल रचली. यावेळी प्रीतम कोटालच्या थ्रो-इनवर मानवीर सिंगने हेडरवर फ्लिक करून चेंडू रॉय कृष्णाला दिला होता. यावर गोलरक्षक मोहम्मद नवाज चुकला होता, मात्र मोक्याच्या क्षणी बचावपटू जेम्स डॉनाचीने चेंडू बाहेर लाथाडल्यामुळे एफसी गोवावर गोल होऊ शकला नाही.
त्यानंतर सहाव्या मिनिटाला फ्रि कीकवर मिळालेल्या चेंडूवर रॉय कृष्णाने हाणलेला फटका डॉनाचीने परत एकदा परतावून लावला. तीन मिनिटांनंतर रॉय कृष्णाने दिलेल्या पासवर डॅव्हीड विलियम्सचा कमजोर फटका सरळ नवाजच्या हातात गेला. एफसी गोवाची पहिली धोकादायक म्हणता येणारी चाल 14व्या मिनिटाला झाली. यावेळी एदू बेडियाने घेतलेला क्रॉस एटीकेचा बचावपटू टिरीने परतविला खरा, मात्र समोरच असलेल्या सावियर गामाला मिळाला. मात्र गामाने गोल करण्याची संधी सदोष नेमबाजीने दवडली.
40व्या मिनिटाला एटीके मोहन बागानची गोल करण्याची संधी गोलच्या उजव्या खांब्याला आदळून परत आल्याने वाया गेली. डॅव्हीड विलियम्सने लांब पल्ल्यावरून मारलेल्या व्हॉलीवर नवाजही अडविण्यात चुकला होता. दुसऱया सत्रातील खेळावर एफसी गोवाचे वर्चस्व होते. मात्र एफसी गोव्याचा काल दिवस नव्हता. त्यांचे कित्येक गोल करण्याचे प्रयत्न थोडक्यात हुकले.
प्रथम 51व्या मिनिटाला सिमीनलॅन डुंगलचा हेडर एटीकेच्या गोलखांब्यावरून गेला. त्यानंतर एटीकेच्या डॅव्हीड विलियम्सने सरळ फटका गोलरक्षक नवाजच्या हातात मारला. 56व्या मिनिटाला एफसी गोवाची गोल करण्याची संधी एटीके मोहन बागानचा गोलरक्षक अरिंदम भट्टाचार्यने आपल्या डाव्या बाजूने झेपावत उधळून लावली. एटीकेने या सामन्यातील विजय गोलाची नोंद 85व्या मिनिटाला केली. बदली खेळाडू एwबान डोहलिंगने रॉय कृष्णाला बचावकक्षेत पाडल्याबद्दल रेफ्रीने एटीकेला पेनल्टी फटका बहाल केला व यावर रॉयनेच नवाजला भेदले आणि विजयी गोल केला.
त्यापूर्वी एफसी गोवाचा बदली खेळाडू जॉर्गे ऑर्तिज मेंडोंझा गोल करण्याच्या यत्नात असताना एटीकेच्या बचावफळीतील एका खेळाडूने धक्का देत त्याला पाडले. मात्र एफसी गोवाच्या खेळाडूंनी पेनल्टीसाठी केलेले अपिल रेफ्रीने फेटाळून लावले होते. इंज्युरी वेळेत एफसी गोवाचे दोन वेळा गोल करण्याचे यत्न थोडक्यात हुकले. प्रथम सावियार गामाचा लांब पल्ल्यावरील फटका गोलरक्षक अरिंदम भट्टाचार्यने पंच करून कॉर्नरसाठी बाहेर टाकला. त्यानंतर मारलेल्या कॉर्नरवर एदू बेडियाने दिशाहीन हेडर मारून गोल बाद करण्याची नामी संधी गमविली.