बसस्थानक-सिद्धेश्वर देवस्थान मार्गाची दयनीय अवस्था
कणबर्गी : एकीकडे स्मार्ट सिटी योजनेंतर्गत शहराचा विकास होतो आहे तर दुसरीकडे प्रशासनाकडून महिनोन्महिने दुरवस्थेत असलेल्या रस्त्यांकडे साफ दुर्लक्ष केले जात आहे. कणबर्गी येथील बसस्थानक ते श्री सिद्धेश्वर देवस्थान मार्ग इंडाल रोडची दयनीय अवस्था झाली आहे. तसेच गावातील महत्त्वाच्या रस्त्यांवर मोठमोठे खड्डे पडले आहेत. त्यामुळे वाहनधारकांना व पादचाऱयांना जीव मुठीत घेऊन प्रवास करावा लागत आहे.
बसस्थानक ते श्री सिद्धेश्वर देवस्थान या नेहमीच्या वर्दळीच्या मार्गावर कामगारवर्ग, देवस्थानचे भाविक, शाळेचे विद्यार्थी मोठय़ा प्रमाणात ये-जा करत असतात. येथेच चार ते पाच इंच खोलीचे मोठमोठे खड्डे पडल्याने नागरिकांची डोकेदुखी वाढली आहे. रात्रीच्या वेळी येथून
ये-जा करणाऱया वयोवृद्ध पादचाऱयांना अनेक अडचणींचा सामना करावा लागत आहे. तसेच खड्डय़ांचा अंदाज येत नसल्याने अनेक वयोवृद्ध पादचारी पडून जखमी झाल्याचे प्रकार वाढले आहेत. पावसाळय़ात या खड्डय़ांमध्ये पाणी साचून राहिल्याने रात्रीच्यावेळी वाहने घसरून अपघाताचे प्रमाण वाढले आहे.
या महत्त्वाच्या मार्गावरून नागरिकांची वर्दळ अधिक असल्याने कोणत्याही प्रकारचा अनर्थ घडण्यापूर्वी प्रशासनाने त्वरित याकडे लक्ष घालून या रस्त्याची दुरुस्ती करावी आणि वाहनधारकांना दिलासा द्यावा, अशी मागणी होत आहे.









