आटपाट नगर होतं. नगराच्या प्रत्येक पेठेत लोकसंख्या नुसती ठासून भरली होती. कोरोनाच्या तोंडाला पाणी सुटावं अशी. अठरापगड जातीचे लोक सोसायटीत, बंगल्यात, वाडय़ात, चाळीत, झोपडपट्टीत, फूटपाथवर, रेल्वे आणि बसच्या स्थानकावर…जागा मिळेल तिथे रहात होते.
एक दिवस कोरोनाची साथ आली. आली आणि तिथंच राहिली. लोकांनी लॉकडाऊन पाळलं. सोशल डिस्टान्सिंग केलं. लशी टोचल्या. आयुर्वेदिक उपाय केले. काढे प्याले. योगासनं केली. व्रतेवैकल्ये केली. पण साथ गेली नाही. खेडय़ापाडय़ात लोकांनी कोरोना देवीची स्थापना केली. देवीपुढे कोंबडी कापायला सुरुवात केली. कोरोनाच्या रुग्णाला देवीच्या देवळापुढे आणून कडुलिंबाच्या फोकाने मारण्याचे उपाय सुरू केले.
सरकारने आटपाट नगराचे तीन भाग केले-ग्रीन झोन, ऑरेंज झोन आणि रेड झोन.
रेड झोनमध्ये राहणारी एक मुलगी वयात आली होती. तिला सरकारी नोकरीतली तीन स्थळं सांगून आली.
एक तरुण तिच्याच शेजारी राहायचा. दोघे फेसबुक आणि व्हॉट्सपवर एकमेकांच्या संपर्कात होते. रोज सकाळी ती दूध आणि रोज लागणाऱया जीवनावश्यक वस्तू आणायला निघाली की त्याला मेसेज करायची. तो तिच्यासाठी नंबर धरायचा. दोघे एक मीटर अंतरावरून मास्क न काढता एकमेकांशी गप्पा मारायचे. त्याचं तिच्यावर प्रेम होतं. पण त्यानं थेट तिला सांगितलं नव्हतं. तिच्या लग्नाची बोलणी सुरू झालीत हे समजल्यावर त्याने आईवडिलांकरवी तिच्या घरातल्यांना निरोप दिला. तिला तो मित्र म्हणून आवडलेला होता. पण मास्क काढल्यावर कसा दिसतो ते ठाऊक नव्हतं. तिची आई कारस्थानी होती. मराठी मालिका पाहून तिचं मत झालं होतं की जावई मिळावा तो ग्रीन झोनमधला.
दुसरा तरुण ऑरेंज झोनमध्ये रहायचा. मौजमजा करायचा. सोशल मीडियावर पोस्ट टाकून लोकांना सांगायचा की सकारात्मक विचार करा वगैरे. तिला त्याच्या फेसबुक आणि व्हॉट्सअपवरच्या पोस्ट्स आवडायच्या. पण त्याच्या आईवडिलांची अट होती की लग्नानंतर मुलीने–जोवर रेड झोनचा ग्रीन होत नाही तोवर-माहेरी जाऊ नये.
तिसरा ग्रीन झोनमधला तरुण देखणा होता. त्याच्या आईवडिलांना स्थळ पसंत होतं. पण तिला शंका होती की त्याला ग्रीन झोनमध्ये खूप मैत्रिणी असतील. अनेकींशी प्रेम आणि ब्रेकअप झालं असेल.
तिचं कोणाशी ठरलं, कसं लग्न झालं-ते उद्या सांगतो.








