नगरपंचायतीत भाजपला धक्का : प्रकाश हुक्केरी, उत्तम पाटील गटाची बाजी : अथणी नगरपरिषदेवर काँग्रेसचा वरचष्मा
संपूर्ण जिल्हय़ाचे लक्ष लागलेल्या शहरी संस्थांच्या निवडणुकीत भाजप व काँग्रेसला समान यश मिळाले. गुरुवारी जाहीर झालेल्या निकालात एकसंबा व बोरगाव नगरपंचायतीत मंत्री शशिकला जोल्ले व खासदार आण्णासाहेब जोल्ले यांच्या नेतृत्वाखाली भाजपला पराभवाचा धक्का बसला. एकसंबा येथे 17 पैकी 16 जागांवर निर्विवाद वर्चस्व मिळवित माजी खासदार प्रकाश हुक्केरी व आमदार गणेश हुक्केरी या पिता–पुत्राच्या नेतृत्वाखाली काँग्रेसने परिवर्तन घडविले. बोरगाव नगरपंचायतीत युवा नेते उत्तम पाटील यांच्या नेतृत्वाखाली नगरविकास पॅनेलने 17 पैकी 16 जागांवर विजय मिळवित सत्ता कायम राखली. अथणी नगर परिषदेत काँग्रेसने स्पष्ट बहुमत मिळवित माजी उपमुख्यमंत्री लक्ष्मण सवदी व आमदार महेश कुमठहळ्ळी या दिग्गजांना आत्मपरीक्षण करण्यास भाग पाडले.
आमदार, खासदार व मंत्र्यांचे गाव असलेल्या एकसंबा नगरपंचायतीसाठी अत्यंत चुरस लागली होती. मोठय़ा प्रमाणात लक्ष्मीवर्षाव झाल्याने पुन्हा एकदा एकसंबा चर्चेत आले होते. अशावेळी गुरुवारची लक्ष्मी कोणाला पावणार याची उत्सुकता लागली होती. गुरुवारी आठ वाजता मतमोजणी सुरू होताच 10 वाजण्यापूर्वीच सर्व चित्र स्पष्ट झाले. यात हुक्केरी यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेसने 17 पैकी 16 जागा मिळविल्या. तर सत्ताधारी भाजपला केवळ एका जागेवर चार मतांनी निसटता विजय मिळाला.
बोरगाव नगरपंचायतीसाठी तिरंगी लढत झाली होती. यात भाजपने चिन्हावर तर उत्तम पाटील व आण्णासाहेब हावले गटाने स्वतंत्र पॅनेलचे उमेदवार उभे केले होते. प्रचारादरम्यान येथे जोरदार चुरस, सर्वच नेत्यांनी प्रचारफेऱया, जाहीर सभा व घरोघरी मतदारांच्या भेटीगाठी घेत मतयाचना केल्याने निकालाबाबत मोठी उत्सुकता होती. मात्र निकालात 17 पैकी तब्बल 16 जागांवर उत्तम पाटील गटाच्या नगरविकास पॅनेलने तर उर्वरित एका जागेवर हावले गटाने विजय मिळविला. येथे भाजपला खातेही खोलता आले नाही.
अथणी नगरपरिषद आणि कागवाड तालुक्यातील उगारखुर्द, ऐनापूर आणि शेडबाळ नगरपंचायतीसाठी चुरशीने मतदान झाले होते. अथणी नगरपरिषदेत काँग्रेसने 27 पैकी 15 जागांवर विजय मिळवित भाजपचे माजी उपमुख्यमंत्री लक्ष्मण सवदी आणि आमदार महेश कुमठहळ्ळी यांना धक्का दिला. उगारखुर्द नगरपरिषदेच्या 23 जागांपैकी 11 जागा काँग्रेसने जिंकल्या असून त्यांना बहुमतासाठी एका जागेची गरज आहे. तर येथे भाजपला 5 जागांवर समाधान मानावे लागले. शेडबाळ नगरपंचायतीवर भाजपने 16 पैकी 12 जागांवर बाजी मारली असून याठिकाणी काँग्रेस 2, अपक्ष 1 आणि निजदने 1 जागा जिंकली. ऐनापूर नगरपंचायतीतील 19 पैकी 13 जागांवर काँग्रेसने विजय मिळवित निर्विवाद वर्चस्व मिळविले असून भाजपला 6 जागांवर समाधान मानावे लागले.
रायबाग तालुक्यातील दोन नगरपरिषद आणि दोन नगरपंचायतीची मतमोजणी गुरुवारी पार पडली. हारुगेरी आणि मुगळखोड नगरपरिषदेवर आमदार पी. राजीव यांच्या नेतृत्वाखाली भाजपने विजय मिळविला.
कंकणवाडी नगरपंचायतीच्या 17 पैकी 12 जागांवर भाजपने बाजी मारली तर काँग्रेसला 5 जागा मिळाल्या. तसेच चिंचली नगरपंचायतीच्या चाव्या अपक्षांच्या हाती आल्याचे चित्र आहे. येथे 19 जागांपैकी 8 जागांवर काँग्रेस, भाजप 6 आणि अपक्षांनी 5 जागांवर बाजी मारली आहे.
मुडलगी तालुक्यातील अरभावी, कल्लोळी, नागनुरी या स्थानिक स्वराज्य संस्थांसाठीही चुरशीने आणि शांततेत मतदान झाले होते. गुरुवारी झालेल्या मतमोजणीत अरभावी येथील 16 पैकी 5 जागांवर भाजपने तर 11 जागांवर आमदार भालचंद्र जारकीहोळी यांनी पाठिंबा दिलेल्या गटाने विजय मिळविला आहे. कल्लोळी येथील 16 पैकी 6 जागांवर भाजप आणि 10 जागांवर भालचंद्र जारकीहोळी यांनी पाठिंबा दिलेल्या स्थानिक पॅनेलने यश मिळविले आहे.
याबरोबरच नागनूर नगरपंचायतीच्या 17 पैकी 17 जागांवर आमदार भालचंद्र जारकीहोळी यांच्या स्थानिक पॅनेलच्या उमेदवारांनी विजय मिळविला आहे.