प्रतिनिधी/ बेळगाव
सांबरा एअरफोर्समधील एका एअरमनने डोकीत गोळय़ा झाडून घेऊन आत्महत्या केली आहे. शुक्रवारी सकाळी गार्डरुमजवळील रेस्टरुममध्ये घडलेल्या या घटनेने एकच खळबळ माजली असून आत्महत्येचे कारण समजू शकले नाही.
अमीर हसबु खान (वय 24, मूळचा रा. मेनकलान, जि. भिवनी, हरियाणा, सध्या रा. एटीएस सांबरा) असे त्याचे नाव आहे. शुक्रवारी सकाळी 9.30 वाजण्याच्या सुमारास रेस्टरुमला आतून कडी लावून त्याने आत्महत्या केल्याचे सांगण्यात आले. इन्सास 5.56 रायफलने डोक्मयाच्या उजव्या बाजूला गोळी झाडून घेऊन त्याने आत्महत्या केली आहे. हा प्रकार उघडकीस येताच येथील कर्मचाऱयांनी तातडीने त्याला खासगी इस्पितळात हलविले. उपचाराचा उपयोग न होता सकाळी 11.17 वाजण्याच्या सुमारास त्याचा मृत्यू झाला.
घटनेची माहिती समजताच मारिहाळचे पोलीस निरीक्षक विजयकुमार शिन्नूर व त्यांचे सहकारी घटनास्थळी दाखल झाले. पंचनामा करुन एफआयआर दाखल करण्यात आला. आत्महत्या केलेल्या एअरमनच्या मृतदेहावर उत्तरीय तपासणी करण्यात आली. यासंबंधी मारिहाळ पोलिसांशी संपर्क साधला असता कोणत्या तरी कारणाने जीवनाला कंटाळून त्याने आत्महत्या केली असावी, असे सांगण्यात आले.









