सागरी सीमांचे रक्षण करण्याची जबाबदारी
वृत्तसंस्था / नवी दिल्ली
ऍडमिरल आर. हरि कुमार यांनी मंगळवारी नौदलाचे नवे प्रमुख म्हणून पदभार स्वीकारला आहे. त्यांनी ऍडमिरल कर्मवीर सिंह यांची जागा घेतली आहे. या विशेष क्षणी हरि कुमार यांनी स्वतःच्या आईचा आशीर्वाद घेतला तसेच गळाभेट घेतली आहे. त्यांची ही कृती दर्शविणारी चित्रफित सोशल मीडियावर व्हायरल झाली असून लोकांकडून त्यांचे कौतुक होत आहे.
सागरी सीमांच्या सुरक्षेसाठी शक्य ते सर्व प्रयत्न करणार आहे. नौदल प्रमुख म्हणून पदभार स्वीकारणे माझ्यासाठी मोठय़ा सन्मानाची बाब आहे. भारतीय नौदलाचे लक्ष आमचे राष्ट्रीय सागरी हितसंबंध आणि आव्हानांवर असल्याचे ऍडमिरल आर. हरि कुमार यांनी म्हटले आहे.
ऍडमिरल हरि कुमार यांचा जन्म 1962 मध्ये झाला होता. तर 1983 मध्ये ते नौदलात सामील झाले होते. त्यांनी स्वतःच्या 38 वर्षांच्या प्रदीर्घ कारकीर्दीत भारतीय नौदलाची विमानवाहू युद्धनौका आयएनएस विराटचे कमांडिंग ऑफिसरसह आयएनएस कोरा, निशंक आणि रणवीर युद्धनौकांनाही कमांड केले आहे.
नौदलाच्या पश्चिम कमांडच्या युद्धनौकांच्या ताफ्याचे ऑपरेशन्स ऑफिसर म्हणूनही त्यांनी काम पाहिले आहे. पश्चिम कमांडच्या सीएनसीच्या पदापूर्वी हरि कुमार दिल्लीत सीडीएस जनरल बिपिन रावत यांच्या अंतर्गत इंटीग्रेटेड डिफेन्स स्टाफच्या (आयडीएस) प्रमुख पदावर कार्यरत होते. ऍडमिरल आर. हरि कुमार यांना परम विशिष्ट, अति विशिष्ट सेवा पदकाने गौरविण्यात आले आहे. तसेच त्यांनी अमेरिकेच्या नेव्हल वॉर कॉलेज, महू येथील आर्मी वॉर कॉलेज तसेच ब्रिटनच्या रॉयल कॉलेज ऑफ डिफेन्स स्टडीजमधून अनेक अभ्यासक्रम पूर्ण केले आहेत.









