पत्रकार परिषदेत असोसिएशनच्या अध्यक्षांनी दिली माहिती
प्रतिनिधी /बेळगाव
कर्नाटक ऍग्रीगोल्डमध्ये सर्वसामान्य जनतेने पैसे गुंतविले आहेत. एजंट लोकांनी या कंपनीच्या विश्वासावर अनेकांकडून पैसे गोळा केले आहेत. या कंपनीची कर्नाटकमध्ये मालमत्ता आहे. तेंव्हा सरकारने संबंधित मालमत्ता जप्त करुन गुंतवणूकदारांना रक्कम द्यावी, अशी मागणी अनेकवेळा केली आहे. मात्र त्याकडे दुर्लक्ष केले असल्याने उत्तर कर्नाटकातील सर्व गुंतवणूकदार आणि एजंट 20 डिसेंबर रोजी अधिवेशनाच्या दरम्यान तीव्र आंदोलन करणार आहेत. तरी सर्वांनी या आंदोलनामध्ये आपला सहभाग दर्शवावा, असे आवाहन के. नागभूषणराव यांनी केले आहे.
रामदेव गल्ली येथील गिरीश कॉम्प्लॅक्समधील भगतसिंग सभागृहामध्ये पत्रकार परिषद घेण्यात आली. त्या ठिकाणी हे आवाहन त्यांनी केले आहे. ऍग्री गोल्डमध्ये आंध्रप्रदेश, तेलंगणा यासह आठ राज्यातील जनतेने पैसे गुंतविले आहेत. कर्नाटकमध्ये एकुण 8 लाख 50 हजार ग्राहक आणि एजंट आहेत. आंध्र सरकारने या कंपनीची मालमत्ता जप्त करुन जवळपास 1 हजार कोटींहून अधिक रक्कम ग्राहकांना दिली आहे. तशाच प्रकारे कर्नाटक सरकारने या कंपनीची मालमत्ता जप्त करुन त्याची विक्री करुन ग्राहकांना पैसे द्यावे, असे त्यांनी यावेळी पत्रकार परिषदेत सांगितले.
या कंपनीमध्ये गेली 20 वर्षे गुंतवणूक झाली. मात्र 2015 पासून रक्कम मिळणे बंद झाले. प्रारंभी कंपनीवर विश्वास ठेवून अनेकांनी मोठी रक्कम गुंतविली. त्यामध्ये निवृत्त अधिकारी व कर्मचाऱयांनाचा समावेश अधिक आहे. पैसे मिळत नसल्यामुळे काही गुंतवणूकदार आणि एजंटांनी आत्महत्या केली आहे. त्यांच्या कुटुंबियांना कर्नाटक सरकारने एक रुपयाही दिला नाही. मात्र आंध्र प्रदेश सरकारने त्यांच्या कुटुंबियांना पाच लाख रुपये आर्थिक मदत केली आहे, असेही त्यांनी यावेळी सांगितले.
सरकारच्या नाकार्तेपणामुळे या कंपनीतील गुंतवणूकदार आणि एजंट अडचणीत आले आहेत. देशामध्ये 30 लाखांहून अधिक गुंतवणूकदार आहेत. 6 हजार 500 कोटी रुपये या कंपनीमध्ये गुंतवण्यात आले आहेत. ती रक्कम मिळत नसल्यामुळे अनेक जण तणावाखाली आहेत. त्यामुळेच आता पुन्हा आंदोलन करण्यात येणार असून उत्तर कर्नाटकातील सर्व एजंट व ग्राहकांनी या आंदोलनामध्ये मोठय़ा संख्येने सहभाग दर्शवावा, असे आवाहन करण्यात आले. यावेळी ऍड. नागेश सातेरी, के. गुरूमूर्ती, के. सोमशेखर यांच्यासह इतर एजंट व असोसिएशनचे पदाधिकारी उपस्थित होते.