महापालिका कायद्यान्वये कारवाई करण्यात येणार : मनपा, अबकारी, पोलीस अधिकाऱयांचे पथक नियुक्त
प्रतिनिधी /बेळगाव
हॉटेल आणि बिअरबार बंद करण्यासाठी वेळेचे बंधन घालण्यात आले आहे. मात्र, वेळेचे पालन केले जात नसल्याचे निदर्शनास आले आहे. त्यामुळे महापालिका, पोलीस प्रशासन आणि अबकारी खात्याच्या संयुक्त विद्यमाने रात्री उशिरापर्यंत सुरू राहणाऱया हॉटेल आणि बिअरबारवर कारवाई करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. महापालिका कायद्यान्वये कारवाई करण्यात येणार असल्याची माहिती उपलब्ध झाली आहे.
शहरात अनेक हॉटेल व बिअरबार असून, वेळेत बंद करण्याची सूचना करण्यात आली आहे. व्यवसाय परवाना आणि अन्य खात्यांचे परवाने घेताना नियमांचे पालन करणे बंधनकारक असल्याची अट घालण्यात आली आहे. मात्र, परवाना नियमावलीनुसार वेळेचे बंधन पाळले जात नाही. सर्व नियम व अटी धाब्यावर बसवून रात्री उशिरापर्यंत हॉटेल व बिअरबार सुरू ठेवण्यात येत आहेत. परिणामी शांतता बिघडत असल्याचे पोलीस प्रशासनाच्या निदर्शनास आले आहे. रात्री उशिरापर्यंत हॉटेल व बिअरबार सुरू ठेवल्याने रहिवासी वसाहतीमधील नागरिकांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे.
रहिवाशांच्यादृष्टीने तसेच शहरात शांतता राखण्याच्यादृष्टीने हॉटेल व बिअरबार वेळेत बंद करण्यासाठी कारवाईचा बडगा उगारण्यात येणार आहे. याकरिता पोलीस, मनपा कर्मचारी आणि अबकारी खात्याच्या अधिकाऱयांचे पथक नियुक्त करण्यात येणार आहे. यासाठी पोलीस आयुक्तांनी महापालिका आयुक्तांना पत्र देऊन मनपाच्यावतीने अधिकाऱयांची नियुक्ती करण्याची विनंती केली आहे.
पोलीस आयुक्तांच्या सूचनेनुसार महापालिकेच्या 9 अधिकाऱयांची नियुक्ती करण्यात आली आहे. महापालिकेने हॉटेल तपासणीची जबाबदारी आरोग्य निरीक्षकांवर सोपविली आहे. महापालिकेच्या आरोग्य विभागामार्फत व्यवसाय परवाने दिले जातात. व्यवसाय परवान्यासाठी चौकशी करण्याची जबाबदारी आरोग्य निरीक्षकांवर आहे. त्यामुळे ही जबाबदारी त्यांच्यावर सोपविण्यात आली आहे. रात्री उशिरापर्यंत सुरू ठेवण्यात येणाऱया हॉटेल आणि बिअरबारची पाहणी करून या पथकाच्या माध्यमातून कारवाई करण्यात येणार आहे. महापालिका आणि पोलीस खात्याच्या कायद्यानुसार आणि कोरोना नियमावलीनुसार हॉटेलचालकांवर कारवाई केली जाणार असल्याची माहिती उपलब्ध झाली आहे.
नियुक्त केलेले मनपाचे अधिकारी
| आरोग्य निरीक्षकांचे नाव | मोबाईल क्रमांक | पोलीस स्थानक |
| एस. एम. कुरबेट | 9535362132 | मार्केट पोलीस स्थानक |
| एस. व्ही. कांबळे | 9886431331 | एपीएमसी पोलीस स्थानक |
| एम. एम. धारवाडकर | 9945015371 | एपीएमसी पोलीस स्थानक |
| अनिल बोरगावी | 9632605358 | टिळकवाडी पोलीस स्थानक |
| शीतल रामतीर्थ | 7795762838 | खडेबाजार पोलीस स्थानक |
| शिवानंद भोसले | 8892865133 | शहापूर पोलीस स्थानक |
| पुंडलिक लमाणी | 9900680087 | माळमारुती पोलीस स्थानक |
| यु. ए. गणाचारी | 9448304724 | उद्यमबाग पोलीस स्थानक |
| एम. एन. आदिवासी | 9844290349 | काकती पोलीस स्थानक |









