कोशलपतीच्या राण्यांनी आपली कन्या सत्या आणि जावई कृष्ण यांचा जोडा पाहिला त्यावेळी त्यांना अत्यंत आनंद झाला. कृष्णाने नाग्नजितीच्या प्रेमाखातर कोसलदेशात येऊन विवाहाचा अवघड पण जिंकला हे त्यांनी आपल्या डोळय़ांनीच पाहिले होते. यावरून सत्या व कृष्णाचे एकमेकांवर असलेले प्रेम दिसून येत होते. ते पाहून एकमेकावर आत्यंतिक प्रेम असलेले हे दांपत्य मोठे भाग्याचे आहे, असे त्या राजस्त्रिया म्हणू लागल्या. डोळय़ात पाणी आणून त्यांनी आपल्या लाडक्मया कन्येला निरोप दिला. त्यावेळी त्या सत्याला म्हणाल्या-आज आमचे पुण्य फळाला आले. आमच्या उदरातून जन्म घेऊन तू दैवयोगाने श्रीहरीला पती म्हणून वरलेस. आम्हाला तू भवसागरातून तरून नेणारी नौकाच झाली आहेस. भगवान श्रीहरीला त्या राजपत्न्या नमस्कार करून विनंतीपूर्वक म्हणाल्या-हे यदुनंदना! ही आमची लाडकी कन्या आजवर आम्ही पुत्रवत् सांभाळली आहे. तिला आम्ही आज तुला प्रेमाने अर्पण करीत आहोत. यापुढे आपण हिचे प्रेमाने पालन केले पाहिजे. आमच्या कुळात जन्मून हिने आपला पती म्हणून प्रत्यक्ष श्रीवनमाळीच निवडला. कृष्णाची अर्धांगिनी झाल्याने ही जगन्माता झाली आहे. दोन्ही हातांनी सत्याला उचलून त्यांनी यादवांच्या मांडीवर बसवली व त्यांना सत्याचा सांभाळ करायची विनंती केली.
यादवांच्या सर्व वऱहाडाचा यथायोग्य सन्मान कोसलनरेशाने केला. सर्वांना भेटवस्तू देण्यात आल्या. आता कन्येला निरोप द्यायची वेळ आली.
रथी बैसवूनियां दंपती । प्रबळसेनावेष्टित भोंवती ।
स्नेहाविष्ट कोशलपति । द्रवला चित्तीं ते काळीं ।
नाग्नजितीचा वियोगखेद । कीं कृष्णलाभाचा परमानंद । उभययोगें न वदे शब्द । पुशी बाष्पोद पुनः पुन्हा ।
कन्या सत्या व कृष्ण एका सुसज्ज रथात आरुढ झाले. आता आपली लाडकी कन्या आपल्यापासून दूर जाणार याचे दु:ख नाग्नाजिताला होत होते. त्याचबरोबर कृष्णासारखा मातब्बर जावई मिळाल्याचा आनंदही त्याच्या मनाला होत होता. त्याच्या तोंडून शब्दही बाहेर पडेना. अश्रूपूर्ण नयनाने त्याने सत्याला निरोप दिला.
आज्ञा मागोनि कोशलपति। मूळ वऱहाडी स्वपुरा जाती । यादव चालतां द्वारकापथीं । वर्तला ख्याति तें ऐका। नाग्नजितीच्या लावण्यरूपा । ऐकोनि अवस्था लागली भूपां । तिहीं पूर्वीं वृषभदर्पा । दमितां संतापा पावले । वृषभ दमितां पावले भंगा । विषाणप्रहारिं भेदले अंगा । लज्जित होऊनि गेले मागां । तिहीं या प्रसंगा ऐकोनी । कृष्णें सप्त वृषभ दमिले। नाग्नजितीतें प्रतापें वरिलें । हें ऐकोनि विषादा चढिले। रोधिते जाले मार्गातें । पूर्वीं वैदर्भीच्या हरणीं। यादवीं भंगिले समराङ्गणीं । जरासंधाच्या साह्याचरणीं । त्रासिले रणीं यदुसुभटीं । भग्नवीर्य नग्न उघडे । निर्लज्ज पळाले यादवांपुढें । सप्त वृषभी मोडिलीं हाडें । वधूचे चाडे तिहीं पुढती । राठापुरीच्या पश्चिमदेशीं । निर्जळमरुमंडळप्रदेशीं । बळें नोवरी हारावयासी । मार्ग रोधूनि राहिले । पूर्वीं भंगले होते जितुके । समानदु:खी मिळोनि तितुके । कन्या नेतां यदुनायकें । दुर्मर्ष तवकें उठावले ।
देवदत्त परुळेकर








