1992 ते 2000 या काळात मी ज्या कचेरीत होतो तिच्या कुंपणाबाहेर एक कैरीचे झाड होते. होय, कैरीचे झाड. झाड अगदी अशक्त, वठलेले होते.
फेब्रुवारी सरत आला की उन्हाळय़ाची कढत चाहूल लागायची. उन्हाळय़ाच्या दिवसात डोक्मयावरचा पंखा सतत चालू असला तरी अंगाची लाही लाही व्हायची. पुनः पुन्हा तहान लागायची. कॅण्टीनमधून सरबत मागवलं तरी ते आमच्यापर्यंत पोचेतो मचूळ होई. व्हरांडय़ात वॉटर कूलर होता. काम करताना उठून आम्ही गार पाण्याची बाटली भरून आणायचो. ती चटकन संपायची. सारखं सारखं पाणी पिऊन भूक मरायची.
पण याच दिवसात कैरीच्या झाडाला छोटय़ा लिंबाएवढय़ा कैऱया येत आणि झडून जात. काही कैऱया आमच्या हद्दीत पडत. जेवणाच्या सुट्टीत डबा खाण्याआधी आम्ही एकदोन कैऱया घेऊन यायचो. धुवून एकेका कैरीचे सुरीने चार तुकडे करायचो. डब्यातली गार भेंडी, गवार, बटाटा, कोबी कोणतीही भाजी असो. तोंडी लावायला या बाळकैरीची आंबट तुरट फोड असली की कसाबसा डबा खाऊन होई.
एखादा सहकारी मोठय़ा रजेवर असायचा. काही कामानिमित्ताने दुपारी ऑफिसला येणार असला तर आम्ही त्याला कांदा-मिरची वगैरे घातलेली पण सुकी भेळ आणायला सांगायचो. ती भेळ आणली की झाडाखाली पडलेल्या बाळकैऱया उचलून आणणं ओघानंच आलं. अनेक भेळींच्या आनंदात या कैऱयांनी चवीचे चार चंद्र लावले आहेत. एखाद्या वेळी भेळ आणली आहे पण कैरीचं झाड प्रसन्न न झाल्यामुळे कैरी मिळाली नाही असं देखील झालं आहे!
कुंपणाला खेटून स्पोर्ट्स क्लबचं आणि कर्मचाऱयांच्या पतपेढीचं ऑफिस होतं. ऑफिसची एखादी मिटिंग किंवा सोसायटीची सभा स्पोर्ट्स क्लबमध्ये असली की मी खिडकीत बसून ते कैरीचं झाड न्याहाळायचो. अचानक कधी कधी वळवाच्या पावसाआधी जोराचा वारा सुटायचा तेव्हा खिडकीतून आत धूळ यायची, पण त्याबरोबर आंब्याच्या पानांना असतो तो मऊ गोड वास देखील यायचा. केस विस्कटले, त्यात माती गेली तरी काही वाटायचं नाही. शिपाई घाईघाईने खिडक्मयांची पाखं लावून घ्यायचा आणि आम्ही उदासवाणे समोरच्या व्याख्यात्याची बडबड ऐकायचो. आठ-साडे आठ वर्षे त्या झाडानं माझ्या उन्हाळय़ात आनंदाचे गारवे दिले, झाड म्हातारं होतं. माझ्याआधी जाणार हे ठाऊक होतं. म्हणूनच निवृत्त झाल्यावर त्या कचेरीत अनेकदा गेलो तरी त्या कुंपणापाशी गेलो नाही. तिथे झाड दिसणार नाही ही कल्पनाच करवत नाही.








