प्रतिनिधी / बेळगाव
राजस्थानमधील जोधपूर शहराला दि. 16 पासून बेळगावमधून थेट विमानसेवा सुरू केली जात आहे. संजय घोडावत ग्रुपच्या स्टार एअर कंपनीकडून आठवडय़ातून 3 दिवस विमानसेवा सुरू केली जाणार आहे. पश्चिम महाराष्ट्र व उत्तर कर्नाटकातून पहिल्यांदाच या शहराला विमानसेवा सुरू होणार आहे. या विमानसेवेमुळे बेळगाव परिसरातील राजस्थानी व मारवाडी समाजाकडून समाधान व्यक्त होत आहे.
बेळगाव हे राज्यातील तिसऱया क्रमांकाचे विमानतळ बनले आहे. देशाच्या प्रमुख शहरांना बेळगावमधून विमानसेवा दिली आहे. यामुळे प्रवाशांची संख्या वाढत आहे. स्टार एअरने यापूर्वी सुरू न केलेल्या शहरांना विमानसेवा देण्यास सुरुवात केली आहे. यापूर्वी अहमदाबाद, सूरत, इंदूर व अजमेर शहरांना विमानसेवा सुरू होती. यामुळे उत्तर भारतात जाणाऱया प्रवाशांची सोय होऊ लागली. बेळगाव, कोल्हापूर, हुबळी, गोवा या परिसरात मोठय़ा प्रमाणात राजस्थानी व मारवाडी समाज व्यवसायानिमित्त वसला आहे. या समाजातील व्यक्तींची नेहमी राजस्थानला ये-जा असते. बस व रेल्वेने आजवर हे प्रवासी प्रवास करत होते. परंतु विमानसेवा सुरू करण्याची मागणी मारवाडी समाजाने अनेकवेळा लोकप्रतिनिधींकडे केली होती.
अशी असणार विमानसेवा मंगळवार, गुरुवार, रविवार असे 3 दिवस विमानसेवा सुरू होणार आहे. सव्वादोन तासात बेळगावमधून जोधपूरला पोहोचता येणार आहे. सकाळी 10 वा. बेळगाव येथून निघालेले विमान 12.10 वा. जोधपूरला पोहोचणार आहे. तर दु. 12.40 वा. जोधपूर येथून निघालेले विमान दुपारी 2.50 वा. बेळगावला पोहोचणार आहे. या विमान फेरीसाठी 3499 रुपये प्राथमिक दर ठरविण्यात आला आहे.









