वार्ताहर / किणये
उद्यमबाग औद्योगिक वसाहतीमधील रस्त्यांची दयनीय अवस्था झाली आहे. ठिकठिकाणी रस्त्यांवर मोठमोठे खड्डे पडलेले आहेत. तसेच रस्त्यांचा बहुतांशी भाग पूर्णपणे उखडून गेला आहे. यामुळे खड्डे, धूळ व मातीचे साम्राज्य या रस्त्यांवर पसरले आहे.
गेल्या वर्षभरापासून या परिसरातील रस्त्यांच्या दुरुस्तीकडे प्रशासनाचे दुर्लक्ष झाले असल्याच्या तक्रारी औद्योगिक वसाहतीमधील उद्योजकांकडून होत आहेत. उद्यमबाग येथील स्टेट बँकेच्या बाजूला असलेले रस्ते तसेच सरकारी आयटीआय कॉलेजच्या पाठीमागील व बेम्को क्रॉस जवळील अनगोळकडे जाणाऱया रस्त्याच्या बाजूकडील औद्योगिक वसाहतीमधील रस्त्यांवर खड्डेच खड्डे पडलेले निदर्शनास येत आहेत.
या खड्डेमय रस्त्यांमुळे कामगार वर्गाला नाहक त्रास सहन करावा लागत आहे. तसेच औद्योगिक वसाहतीमधील कारखान्यांमध्ये येणाऱया वाहनधारकांनाही खड्डय़ांचा त्रास जाणवू लागला आहे. रात्रीच्या वेळी ये-जा करणाऱया कामगार वर्गाला या रस्त्यावरून वाहतूक करणे जोखीमचे ठरले आहे तसेच किरकोळ अपघातांच्या घटनाही घडू लागल्या आहेत.
वसाहतींमधील बहुतांशी रस्ते पूर्णपणे उखडून गेलेले आहेत. या रस्त्यांवर ये-जा करताना समोरच्या वाहनधारकांना धूळ-मातीचा सामना करावा लागतो आहे. एकीकडे बेळगाव स्मार्ट सिटी करण्यासाठी प्रशासनाची धडपड सुरू आहे. मग या औद्योगिक वसाहतीमधील रस्त्यांची दुरुस्ती कधी करणार, असा सवालही उपस्थित होऊ लागला आहे. औद्योगिक वसाहतीमधील या रस्त्याची त्वरित दुरुस्ती करण्यात यावी, अशी उद्योजक व कामगार वर्गातून मागणी जोर धरू लागली आहे.









