माजी शिक्षणमंत्री तावडेंकडून समर्थन
प्रतिनिधी/ चिपळूण
आई-वडिलांची गरीब परिस्थिती पहाता मोठय़ा विद्यापीठात लाखो रूपये डोनेशन भरून उदय सामंत यांच्यासह आमच्यासारख्या मुलांना शिक्षण देणे शक्य नव्हते. यामुळेच आम्ही पुण्यातील ज्ञानेश्वर विद्यापीठात शिकलो. या विद्यापीठातून बाहेर पडलेले अनेक विद्यार्थी आज राजकारणात चांगले काम करीत आहेत. त्यामुळे सामंत यांच्या पदवीवर बोट ठेऊ नका. काम चुकल्यास मात्र जाब विचारा, असे मत माजी शिक्षणमंत्री विनोद तावडे यांनी मंगळवारी येथे आयोजित पत्रकार परिषदेत व्यक्त केले.
तावडे पुढे म्हणाले की, एका मुख्यमंत्री पदासाठी उध्दव ठाकरे यांनी वडिलांच्या विचारांना तिलांजली दिली. हे सरकार जनादेशाने झालेले नसून परस्पर भिन्न विचारांचे सरकार जास्त दिवस टिकत नाही व त्यांच्याकडून जनतेचे हितही होत नाही. त्यांचे सरकार स्थगिती सरकार न बनता गतिमान सरकार करण्यासाठी प्रयत्न करावेत अशी बोचरी टीका केली.
पेढे-परशुराम वाद मिटवण्यासाठी पुढाकार घेणार
मुंबई-गोवा महामार्गाच्या चौपदरीकरण कामात मोबदल्यावरून निर्माण झालेल्या पेढे-परशुराम वादाबाबत ते म्हणाले की कोणाला किती मोबदला द्यायचा याचा नियम आहे. त्यानुसार त्याचे वाटप होईल , तरीही वाद झाल्यास तो मिटवण्यासाठी आपण पुढाकार घेऊ.
विद्यार्थ्यांना सिगारेटचे 10 हजार बिल चालते!
शिक्षण शुल्क वाढवले की विद्यार्थ्यांची आंदोलने सुरू होतात. शुल्क 600 रूपये केले की राष्ट्रपती भवनावर मोर्चा काढून त्याला राजकीय रंग देण्याचा प्रयत्न काही राजकारणी करतात. मात्र याच विद्यार्थ्यांची विद्यापीठाबाहेरील टपऱयांवर होणारी महिन्याची सिगारेटची 10 हजार रूपयांची बिले भरण्यासाठी त्यांच्याकडे पैसे असतात हा कोणता प्रकार आहे, याचाही त्यांना साथ देणाऱयांनी विचार करण्याची गरज असल्याचे तावडे म्हणाले.
नाथाभाऊ नाराज नाहीत!
भाजपचे ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे पक्षावर नाराज आहेत का, या पत्रकारांच्या प्रश्नाला उत्तर देताना तावडे म्हणाले की, नाथाभाऊंनी पक्ष उभारणीसाठी घाम गाळला आहे. त्यामुळे काही गोष्टींवरून ते नाराज होणे स्वाभाविक आहे. मात्र त्यांच्या नाराजीची पंतप्रधान नरेंद्र मोदी, पक्षाचे अध्यक्ष अमित शहा यांनी दखल घेतली आहे. काही बाबतीत त्यांची नाराजी दूर झाली आहे. त्यामुळे सध्या ते नाराज नसल्याचे तावडे यांनी स्पष्ट केले.
मंत्र्यांनी नेतृत्व करणे चुकीचे- किरीट सोमय्या
जेएनयूमधील प्रकार कसा घडला, कोणी घडवला याचे सीसीटीव्हीचे फुटेज पोलिसांकडे आहे. त्यानुसार पोलीस त्याचा तपास लावतील. न्यायालय, सरकार यांची बंदी असतानाही गेट वे ऑफ इंडिया परिसरात निदर्शने करण्यात आली. याला जुन्नर ठाकरे व राष्ट्रवादीचे मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी मार्गदर्शन करून विद्यार्थ्यांना भडकवण्याचा प्रयत्न केला. याची आपण कुलाबा पोलीस स्थानकात तक्रार केली असून कारवाईत दिरंगाई झाल्यास कडक भूमिका घेतली जाणार असल्याचे भाजपचे नेते किरीट सोमय्या यांनी सांगितले.









