थेट खात्यात होणार जमा : जिल्हाधिकारी अजित रॉय यांच्याकडून आदेश जारी किमान रु. 10 हजार तर कमाल 50 हजारची मदत
प्रतिनिधी /पणजी
राज्य सरकारने उत्तर गोवा जिह्यातील पूरग्रस्तांना सुमारे 1.90 कोटीचा निधी मंजूर केला असून ती आर्थिक मदत पूरग्रस्तांच्या बँक खात्यावर थेट जमा होणार आहे. उत्तर गोव्यातील डिचोली – सत्तरी – पेडणे व इतर तालुक्यातील सुमारे 301 जणांना हा निधी मिळणार आहे. उत्तर गोवा जिल्हाधिकारी अजित रॉय यांनी सदर अर्थसाहाय्य मंजुरीचा आदेश जारी केला आहे.
महसूल खात्यातर्फे राज्य आपत्कालीन व्यवस्थापन निधीतून हे अर्थसाहाय्य देण्यात आले आहे. पूरग्रस्तांना सरकारतर्फे निधीसोबत प्रमाणपत्रही देण्यात येणार आहे. किमान रु. 10 हजार आणि कमाल 50 हजार अशी ही मदत देण्यात आली आहे.
गोव्यात 22/23 जुलै असे दोन दिवस मोठय़ा प्रमाणात पाऊस पडल्याने पूर येऊन अनेक घरे कोसळली व काही घरांची मोठी हानी झाली. त्यांना भरपाई देण्याचे आश्वासन सरकारतर्फे देण्यात आले होते. त्यानुसार सदर भरपाई जारी करण्यात आली आहे. पूरग्रस्त कुटुंबांना तातडीची मदत म्हणून पंचायतीकडून पंचायत निधीतून रु. 10 हजार देण्याची तरतूद पंचायत कायद्यात आहे. ती मदतही त्यांना देण्याचे आदेश सरकारतर्फे पंचायत खात्यास देण्यात आल्याचे सूत्रांनी सांगितले.









