मुख्यमंत्रिपदी शपथबद्ध – पंतप्रधानांनी केले अभिनंदन
डेहराडून / वृत्तसंस्था
त्रिवेंद्रसिंग रावत यांनी मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा दिल्यानंतर बुधवारी तीरथसिंग रावत यांनी उत्तराखंड मुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली. राज्यपाल बेबी राणी मौर्य यांनी त्यांना पद व गोपनीयतेची शपथ दिली. त्रिवेंद्रसिंग रावत यांनी मंगळवारी मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा दिला होता. यानंतर भाजपमधल्या अनेक नावांची मुख्यमंत्रिपदासाठी चर्चा सुरू होती. पण बुधवारी सकाळी भाजप नेतृत्वाने तीरथसिंग रावत यांच्या नावावर शिक्कामोर्तब केले. 56 वर्षीय रावत हे यापूर्वी भाजपचे उत्तराखंडचे प्रदेशाध्यक्ष होते. ते पौडी गढवाल लोकसभा मतदारसंघाचे खासदार आहेत. दरम्यान, तीरथसिंग रावत यांनी शपथ घेतल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी त्यांचे ट्विटद्वारे अभिनंदन केले असून तीरथसिंग यांच्या संघटनात्मक आणि प्रशासनिक कौशल्याच्या जोरावर उत्तराखंड राज्य नक्कीच प्रगतीचे नवे शिखर गाठेल असा आशावाद व्यक्त केला आहे.
त्रिवेंद्रसिंग रावत यांनी राजीनामा घेतल्यापासून गेले दोन दिवस वेगवेगळय़ा बैठका सुरू होत्या. अखेर डेहराडूनमध्ये झालेल्या भाजपच्या बैठकीत नव्या मुख्यमंत्र्यांच्या नावावर शिक्कामोर्तब करण्यात आले. त्रिवेंद्रसिंग रावत यांच्या उपस्थितीत मुख्यमंत्रिपदासाठी तीरथसिंग रावत यांच्या नावाची घोषणा केली. छत्तीसगढचे माजी मुख्यमंत्री रमणसिंग आणि भाजपचे प्रदेश प्रभारी दुष्यंत कुमार गौतम पर्यवेक्षक म्हणून उपस्थित होते. बुधवारी सकाळी साडेदहा वाजता झालेल्या बैठकीत त्यांच्या नावाची घोषणा करण्यात आली.
मुख्यमंत्रिपदाच्या शर्यतीत असलेल्यांमध्ये तीरथसिंग रावत यांच्यासह अजय भट्ट, सतपाल महाराज, धनसिंह रावत, अनिल बलुनी, रमेश पोखरियाल निशंक यांचा समावेश होता. यातील धनसिंग रावत, निशंक यांची नावे आघाडीवर होती. उत्तराखंड राज्याची स्थापना झाल्यापासून मागील दोन दशकांत नारायणदत्त तिवारी वगळता एकाही मुख्यमंत्र्याला पाच वर्षांचा कार्यकाळ पूर्ण करता आलेला नाही. यात महाराष्ट्राचे विद्यमान राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांचाही समावेश आहे.
तीरथसिंग यांची राजकीय वाटचाल
राजकारणात तीरथसिंग रावत हे लो-प्रोफाईल नेता म्हणून ओळखले जातात. मात्र, त्यांची आरएसएसमध्ये चांगली पकड आहे. तीरथसिंग रावत यांचा जन्म गढवाल येथील पौडी जिह्यातील सिनो गावात 9 एप्रिल 1964 रोजी झाला. त्यांच्या वडिलांचे नाव कलामसिंग रावत तर आईचे नाव गौर देवी. तीरथसिंग यांनी सर्व प्रथम उत्तर प्रदेश भारतीय जनता युवा मोर्चात प्रवेश केला आणि त्यानंतर त्यांनी उपाध्यक्षपदाचे कामकाज पाहिले. त्यानंतर 1997 मध्ये ते उत्तर प्रदेशमधील विधानपरिषदेत निवडून आले. नंतर त्यांची विधानपरिषदेच्या अध्यक्षपदासाठीही निवड करण्यात आली आणि ज्यावेळी उत्तराखंडमध्ये भाजपचे पहिले सरकार आले त्यावेळी तीरथ यांना शिक्षणमंत्री बनवण्यात आले होते. 2007 साली तीरथ यांची उत्तराखंडाचे महासचिव म्हणून नियुक्ती करण्यात आली. तर 2012 मध्ये ते आमदार म्हणून निवडून आले त्यानंतर 2013 साली त्यांची प्रदेशाध्यक्ष म्हणून निवड केली गेली. तर 2019 च्या लोकसभा निवडणुकीत ते पौड गढवाल येथून विजयी झाले. त्यांनी तब्बल साडेतीन लाख मतांनी मनीष खंडुरी यांचा पराभव केला होता.









