कोरोनाच्या वाढत्या संसर्गाच्या पार्श्वभूमीवर उचगाव ग्रामपंचायतीतर्फे जनजागृती फेरी
वार्ताहर / उचगाव
उचगाव आणि परिसरामध्ये कोरोना संसर्गाच्या वाढत्या पार्श्वभूमीवर उचगाव ग्रामपंचायतीतर्फे बुधवार दि. 5 मे रोजी गावामध्ये ध्वनिक्षेपणासह जनजागृती फेरी काढली. फेरीत सर्व ग्रामस्थांना खबरदारीचा उपाय म्हणून घराबाहेर पडू नका, मास्कचा वापर करा, स्वच्छता राखा, असा संदेशृ देत सर्वांना सावधगिरीच्या सूचना केल्या.
गावामध्ये प्रवेश करणारी सर्व प्रवेशद्वार बांबू बांधून सील करण्यात आली आहेत. तसेच शनिवार दि. 8 मे पर्यंत बाहेरील व्यक्तीने गावात येऊ नये व गावातील व्यक्तीने बाहेरगावी जाऊ नये यासाठी निर्बंध लादण्यात आले आहेत.
कोरोनाची दुसरी लाट आल्यानंतर पश्चिम भागातील काही गावांमध्ये कोरोनाची लागण झाल्याचे आढळून येत आहे. मोठय़ा प्रमाणात रुग्ण आढळल्यामुळे भीतीचे वातावरण पसरले आहे. वेळीच खबरदारी घेतली नाही तर पुढील काही महिन्यात मोठय़ा संकटाला सामोरे जावे लागण्याच्या शक्मयतेमुळे आतापासूनच सर्व नागरिकांनी काळजी घ्यावी, असे आवाहनही ग्राम. पं. व आरोग्य खात्याने केले आहे.
मंगळवारी उचगाव आणि परिसरात कोरोनाचे रुग्ण आढळल्याने या संदर्भात ‘तरुण भारत’ मधून वृत्त प्रसिद्ध झाले आणि सर्व नागरिकांना सावध राहण्याचे आरोग्य खात्याकडून कळविण्यात आले. याला अनुसरून उचगाव ग्राम पंचायतीने गावांमध्ये अध्यक्ष, उपाध्यक्षा व सर्व सदस्य तसेच आशा कार्यकर्त्यांसमवेत ध्वनिक्षेपकाद्वारे जनजागृती केली. यावेळी नागरिकांना कोरोना संसर्गाची माहिती देऊन मास्क, सॅनिटायझर, सुरक्षित अंतर ठेवणे, वारंवार हात धुणे, त्याचबरोबर विनाकारण गावांमध्ये फिरणे टाळावे यासंदर्भात सूचना करण्यात आल्या.
उचगाव आरोग्य केंद्रामध्ये लसीचा तुटवडा
सध्या सर्वत्र कोरोना महामारीचा संसर्ग वाढत असल्याने उचगाव प्राथमिक आरोग्य केंद्राच्या कार्यक्षेत्रातील सतरा गावांमधील नागरिकांनी लस घेण्यासाठी गर्दी केली आहे. मात्र, गेल्या चार-पाच दिवसांपासून या प्राथमिक आरोग्य केंद्रांमध्ये लसीचा तुटवडा असल्यामुळे लस देणे बंद केले आहे. यापूर्वी ज्या नागरिकांनी कोरोना प्रतिबंधक लस घेतली असून त्यांचा दुसरा डोस घेणे गरजेचे आहे, असे सर्व नागरिक सध्या आरोग्य केंद्राकडे हेलपाटे मारताना दिसत आहेत. दुसरा डोस आपणाला वेळेत मिळावा यासाठी नागरिकांची धडपड सुरू असल्याचे चित्र दिसून येत आहे. मात्र, आरोग्य केंद्रामध्ये लस उपलब्ध नसल्याने नागरिकांमध्ये नाराजी पसरली आहे. शासनाने तातडीने या आरोग्य केंद्रांमध्ये लस उपलब्ध करून द्यावी, अशी मागणी करण्यात येत आहे.
कोरोना संसर्गापासून नागरिकांनी सावध रहावे, अशी सूचना उचगाव प्राथमिक आरोग्य केंद्राच्या महिला वैद्याधिकारी डॉ. स्मिता गोडसे यांनी केले आहे. या भागातील सर्व नागरिकांनी भीती न बाळगता शासनाच्या नियमावलीचे काटेकोरपणे पालन करावे.
आरोग्य खात्याकडून केलेल्या सूचनांचे वेळोवेळी पालन केल्यास कोणताही धोका होणार नाही. यासाठी सर्वांनी खबरदारी घेणे गरजेचे आहे. तसेच आरोग्य केंद्रांमध्ये लस उपलब्ध झाल्याबरोबर सर्वांना लस देण्यात येईल, असे आरोग्य केंद्राकडून कळविण्यात आले
आहे.









