बारा तोळ्याच्या दागिन्यासह ३ लाख ८१ चा मुद्देमाल हस्तगत
उचगाव / वार्ताहर
उचगाव (ता.करवीर) येथील मणेरमळा मधील घरफोडी उघडकीस आणण्यात गांधीनगर पोलिसांना यश आले असुन चोरीला गेलेले बारा तोळ्याचे सोन्याचे दागिने किंमत रु.३ लाख ८१ हजारचा मुद्देमाल हस्तगत केला. याप्रकरणी अमोल शामराव माने यास पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. साहाय्यक पोलिस निरिक्षक सत्यराज घुले यांच्या नेतृत्वाखाली केवळ दहा दिवसात घरफोडी उघडकीस आणून सर्व मुद्देमाल हस्तगत केल्याने पोलिसांचे कौतुक होत आहे.
याबाबत दिनांक १७/०१/२०२२ रोजी गांधीनगर पोलिसांत गुन्हा दाखल आहे फिर्यादी हे मणेरमाळ, उचगाव, ता. करवीर येथे कुटूंबियासह राहाणेस असून दिनांक ०८/०१/२०२२ रोजी सकाळी ०९ ०० वा ते दिनांक १४/०१/२०२२ या कालावधीतीत त्यांच्या राहात्या घरामधील लोखंडी कपाटातील लॉकरमध्ये ठेवलेले सोन्याचे दागिने ज्यामध्ये सोन्याची गंठन २ नग, नेकलेस, लक्ष्मीहार, चेन, कानातील वेल व साखळी, झुबे, अंगठी असे एकूण १२ तोळे वजनाचे ३,८१,५००/- किंमतीचे दागिने कोणीतरी अज्ञात चोरट्याने घरामध्ये ठेवलेल्या दरवाजाच्या कुलपाच्या किल्लीचा वापर करुन चोरी केलेबाबत गांधीनगर पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला होता.
या गुन्ह्याचा तपास पोलीस अधीक्षक, कोल्हापूर, अपर पोलीस अधीक्षक, कोल्हापूर तसेच मा. उपविभागीय पोलीस अधिकारी, करवीर विभाग, कोल्हापूर यांचे मार्गदर्शनाखाली सत्यराज घुले स. पो. नि. गांधीनगर पोलीस ठाणे व इतर स्टाफ हे करत होते. या घटनेच्या तपासाच्या अनुषंगाने मा. उपविभागीय पोलीस अधिकारी संकेत गोसावी, यांनी घटनास्थळी भेट देवून सुचना दिल्या होत्या. त्याप्रमाणे सत्यराज घुले व गांधीनगर पोलीस ठाणेकडील पोलीस अंमलदार पो.हे.काँ. मोहन गवळी, पोहेकाँ मनोज खोत, विराज डांगे, दिगंबर सुतार, पो. ना. आकाश पाटील, चेतन बोंगाळे, आयुब शेख यांनी कौशल्याने गुन्ह्याचा तपास करुन व बातमीदारमार्फत आरोपीबाबत माहीती मिळवून अमोल शामराव माने (वय ३४ वर्षे रा. सोना अपार्टमेंटजवळ, पाटील कॉलनी, मणेरमाळ, उचगाव ता करवीर ) यास ताब्यात घेतले. त्याचेकडे तपास करुन गुन्हा उघडकीस आणला असून त्याचेकडून या गुन्ह्यातील सर्व मुद्देमाल जप्त केला गेला.









