शहरात बहुतांश ठिकाणी उघडे चेंबर : वाहनधारकांसह पादचाऱयांना धोकादायक : दुरुस्तीकडे महानगरपालिकेचे दुर्लक्ष : आरोग्य विभागाच्या कारभाराबद्दल नागरिकांतून नाराजी

जीवघेणे ड्रेनेज…
- शहरातील अनेक ठिकाणचे ड्रेनेज चेंबर बनले जीवघेणे
- झाकण घालण्याकडे दुर्लक्ष केल्याने धोकादायक
- नागरिकांनीच उघडय़ा डेनेज चेंबरवर बॅरीकेड्स लावले
- दुर्गंधीमुळे नागरिकांना विविध आजारांना सामोरे जाण्याची वेळ
प्रतिनिधी /बेळगाव

शहरात बहुतांश ठिकाणी डेनेज तुंबण्याचे प्रकार वाढले असून दुरुस्ती करण्यास महापालिकेच्या आधिकाऱयांनी टाळाटाळ चालविली असल्याची तक्रार होत आहे. विविध ठिकाणी असलेल्या चेंबरची दुरुस्ती करण्याऐवजी फक्त झाकण बाजूला ठेवण्यात आले आहेत. उघडय़ावर ठेवण्यात आलेले चेंबर पादचाऱयांना व वाहनधारकांना जीवघेणे बनले आहे.आरोग्य विभागाच्या आंधळय़ा कारभाराबद्दल नाराजी व्यक्त करण्यात येत आहे.
शहराची व्याप्ती वाढल्याने डेनेज वाहिनीवर ताण वाढला आहे. तीस वर्षापूर्वी घालण्यात आलेल्या ड्रेनेजवाहिन्यांना नवीन वसाहतीतील डेनेज वाहिन्यांची जोडणी करण्यात येत आहे. परिणामी ड्रेनेजवाहिन्या तुंबण्याचे प्रकार वाढले आहेत. यामुळे अनगोळ परिसरात अक्षरशः सांडपाण्याची तळी साचली आहेत. निर्माण झालेल्या दुर्गंधीमुळे नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे. अशाप्रकारच्या तक्रारी शहरात रोज होत असून ड्रेनेजची समस्या सोडविण्यास महापालिकेला अपयश आले आहे. काही ठिकाणी महापालिकेचे अधिकारी जाणीवपूर्वक दुर्लक्ष करीत असल्याच्या तक्रारी होत आहेत.क्लब रोडवरील ज्योती कॉलेज गेटसमोर ड्रेनेज वाहिनी तुंबली असून दुरुस्ती करण्यासाठी महापालिकेच्या अधिकाऱयांकडे गेल्या तीन महिन्यांपासून तक्रार करण्यात येत आहे. पण याबाबत महापालिकेच्या अधिकाऱयांनी ठोसपणे कोणतीच कारवाई केली नाही. येथील नागरिकांना दुर्गंधीच्या समस्येला तोंड द्यावे लागत असून महापालिकेचे अधिकारी याची दुरुस्ती केव्हा करणार, असा मुद्दा उपस्थित करण्यात येत आहे.

संगोळी रायाण्णा रोड येथील डेनेज चेंबर खराब झाले असून त्यावर झाकणे नसल्याने नागरिकांना धोकादायक बनले आहे. मुख्य रस्ता असलेल्या ड्रेनेजवाहिनीवरील झाकण काढण्यात आले आहे. यामुळे रात्रीच्या वेळी किंवा माहिती नसलेले नागरिक गेले असता डेनेज चेंबरमध्ये पडण्याचा धोका निर्माण झाला आहे. शहरातील नागरिक पहाटेच्यावेळी फिरावयास गेले असता त्यांच्या लक्षात येत नसल्याने जीवघेणे ड्रेनेज धोकादायक बनले आहे. शहरातील कचराकुंडीत टाकण्यात येणाऱया कचऱयात प्लास्टिक बाटल्या व रद्दी अशा विविध वस्तू टाकण्यात येतात. यामुळे भंगार वेचणारे लोक पहाटेच्यावेळी फिरत असतात. त्यांनादेखील झाकण नसलेले चेंबर धोकादायक बनले आहे. याकडे महापालिकेच्या अधिकाऱयांनी कानाडोळा केला आहे.
शेट्टी गल्लीतील ड्रेनेज अद्याप उघडय़ावर
शेट्टी गल्ली परिसरात ड्रेनेजवाहिनी तुंबल्याने स्वच्छतेसाठी चेंबरचे झाकण काढण्यात आले होते. पण अद्यापही त्यावर झाकण घालण्यात आले नाही. डेनेज चेंबर मुख्य रस्त्याच्या कॉर्नरवर असल्याने वाहनधारक आणि पादचाऱयांच्या लक्षात येत नाही. परिणामी वाहनधारकांना धोकादायक बनले आहे. या रस्त्यावर नेहमी वाहनांची तसेच नागरिकांची वर्दळ असते.त्यामुळे नागरिकांनीच उघडय़ा डेनेज चेंबरवर बॅरीकेड्स लावले आहेत.
न्यायालय परिसर सुट्टीचा दिवस वगळता नेहमी गजबजलेला असतो. याठिकाणी रस्त्याशेजारी असलेल्या गटारीवरील झाकणे नाहीत. तसेच काही ठिकाणी खुपच धोका निर्माण झाला आहे. त्यामुळे ये-जा करणाऱया नागरिकांच्या जीवास धोका निर्माण झाला आहे. महापालिकेच्या अधिकाऱयांच्या वेळकाढु धोरणामुळे नागरिकांना मोठय़ाप्रमाणात त्रास सहन करावा लागत आहे. काही ठिकाणी डेनेज चेंबरचे झाकण खराब झाले असून त्याठिकाणी बॅरीकेड्स आणि दगड ठेवून खबरदारी घेण्यात आली आहे, पण याठिकाणी झाकण घालण्यास टाळाटाळ करीत असल्याच्या तक्रारी नागरिक करीत आहेत. तसेच काही ठिकाणी स्मार्ट सिटी योजनेअंतर्गत डेनेज चेंबर उघडे ठेवण्यात आले आहेत. लोखंडी सळय़ा उघडय़ावर असल्याने पादचारी आणि वाहनधारकांना धोका निर्माण झाला आहे. शहरात ड्रेनेज तुंबण्याच्या आणि उघडय़ावर ठेवलेल्या चेंबरच्या तक्रारी पाहता आरोग्य विभागाचा आंधळा कारभार सुरू असल्याची टीका नागरिक करीत आहेत. उघडय़ावर ठेवण्यात आलेले ड्रेनेज मृत्युचा सापळा बनले आहेत.
ड्रेनेज चेंबरकडे दुर्लक्ष
संगोळी रायाण्णा चौक व नेहरूनगर येथील मुख्य रस्त्यावर ड्रेनेज तुंबल्याने सांडपाणी गटारीमधून वाहत आहे. याची स्वच्छता करण्याकडे मनपाचे साफ दुर्लक्ष झाले असून येथील रहिवांशाना दुर्गंधीचा सामना करावा लागत आहे.परिणामी विविध आजारांना सामोरे जावे लागत असल्याच्या तक्रारी होत आहेत. याकडे स्वच्छता कर्मचारी ड्रेनेज स्वच्छतेकडे साफ दुर्लक्ष करीत आहेत. अधिकारी व कर्मचारी जबाबदारी झटकण्याचा प्रयत्न करीत आहेत. ही बाब मनपाच्या अधिकाऱयांना सांगुनही याची दुरुस्ती करीत नसल्याने नागरिक संताप व्यक्त करीत आहेत.









