क्रीडा प्रतिनिधी /बेळगाव
बेळगाव जिल्हय़ातील होतकरू, उगवता शरीरसौष्टवपटू व चॅम्पियन जीमचे संचालक मुरलीधर भिलारे (वय 23) याचे साखळी गोवा येथे अपघाती निधन झाले.
मुरलीधर भिलारे याने 2017 साली बेळगावच्या आयएमईआर महाविद्यालय आयोजित मि. ग्लॅडिएटर व मि. आयएमईआर या मानाचे किताब पटकाविले होते. त्याचप्रमाणे बेळगाव जिल्हय़ातील विविध शरिरसौष्टव स्पर्धेत 70 व 75 किलो वजनी गटात सुवर्णपदक पटकाविले होते. तो मित्रासमवेत गोवा येथे गेला होता. साखळी -गोवा येथे आपल्या दुचाकीवरून जात असताना दुचाकीचे नियंत्रण सुटून रस्त्याशेजारी कठडय़ावर आदळला. या अपघातात मुरलीधर गंभीर जखमी झाला.
त्याला उपचारासाठी नजीकच्या रुग्णालयात नेण्यात आले. पण वाटेतच त्याचे निधन झाले. त्याच्या निधनामुळे बेळगाव परिसरात हळहळ व्यक्त होत आहे. त्याच्या पश्चात आई, दोन बहिणी व दाजी असा परिवार आहे. शवचिकित्सेची प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आला.









