फूटवेअर जळून खाक, अन्य तीन दुकानांनाही झळ, 19 लाखाचे नुकसान
प्रतिनिधी/ उंब्रज
उंब्रज (ता. कराड) येथील सेवारस्त्यालगत सैनिक बँकेसमोरील एका दुकानास रविवारी रात्री दहाच्या सुमारास अचानक आग लागली. आगीत फूटवेअर दुकान जळून खाक झाले, तर शेजारील जेनेरिक मेडिकल, वडापाव व चहा सेंटर आणि बेकरी अशा एकुण चार दुकानांनाही आगीची झळ बसली. आगीत सुमारे 19 लाखाचे नुकसान झाले आहे.
याबाबत घटनास्थळावरून मिळालेली माहिती अशी की, आशियाई महामार्गालगत सेवारस्त्या शेजारी सैनिक बँकेसमोरील मोकळ्या जागेत दुकानगाळे आहेत. यातील एका बंद असलेल्या फूटवेअर दुकानाला रविवारी रात्री अचानक आग लागली. धूर व ज्वाला बाहेर पडू लागल्याने स्थानिक नागरिकांनी घटनास्थळी धाव घेऊन तातडीने याची माहिती उंब्रज पोलिसांना दिली. घटनास्थळी पोलिसांनी धाव घेऊन सेवारस्त्यावरील वाहतूक बंद करून आग विझविण्यासाठी स्थानिक नागरिकांद्वारे पाण्याचे टँकर मागविले. मात्र तोपर्यंत आगीने रौद्र रुप धारण केल्याने फूटवेअरचे दुकान जळून खाक झाले. तसेच शेजारील चार दुकानांनाही आगीची झळ पोहोचली. सुमारे एक तासाच्या अथक प्रयत्नानंतर आग आटोक्यात आणण्यात स्थानिक नागरिक व युवकांना यश आले. सुदैवाने दुकाने बंद असल्याने कोणतीही जीवितहानी झाली नाही.
व्हॉट्सअप ग्रुपवरून आगीची घटना समजल्यावर युवक व नागरिकांनी मोठय़ा प्रमाणावर आग विझवण्यासाठी धावाधाव केली. सोरजाई पाणीपुरवठा टँकरच्या मदतीने आग विझविण्यासाठी पाणीपुरवठा केला. त्यामुळे आग नियंत्रणात आली. अग्निश्ग्नशामक दलाचे बंब आल्यानंतर आणखी पाण्याचा मारा करण्यात आला. त्यानंतर आग आटोक्यात आली.
घटनास्थळी महसूल अधिकाऱयांनी पाहणी केली. फूटवेअरसह अन्य दुकानांचे 19 लाखांवर नुकसान झाल्याचा पंचनामा केला आहे. या आगीत महाराष्ट्र फूटवेअर जळाल्याने राजकुमार गणपती शिंदे यांचे 12 लाख नुकसान झाले. बालाजी स्वस्त औषधे दुकान जळून विशाल संभाजी मोहिते व सचिन मोहन कमाने यांचे 2 लाखांचे नुकसान झाले. निलेश कृष्णात राऊत यांचे स्वामी अमृततुल्य चहाचे दुकान जळून दीड लाखाची हानी झाली. तसेच विक्रमसिंग अमरसिंग राजपुरोहित याचे राजपुरोहित स्वीटमार्ट जळून 3 लाख 50 हजाराचे नुकसान झाले आहे. उंब्रजचे मंडल अधिकारी व तलाठी यांनी आगीचा पंचनामा केला. मात्र आग लागण्यामागचे कारण समजून येत नसल्याचे त्यांनी सांगितले.









