डिचोली/प्रतिनिधी
सध्या पैरा शिरगाव येथील चौगुले खाण कंपनीच्या जागेतील ई लिलावात खरेदी केलेल्या खनिज मालाच्या डंपातील माल सेसा खाण कंपनी उचलत असून चौगुले खाण कंपनीच्या जागेत डंप सोडून थेट मालाचे बेकायदेशीरपणे उत्खनन होत असल्याचा दावा शिरगाववासीयांनी केला आहे. याबाबत शिरगावचे सरपंच सदानंद गावकर यांनी भर बैठकीत डिचोली उपजिल्हाधिकारी सचिन देसाई यांच्या निदर्शनास सदर बाब आणून दिल्यानंतर उपजिल्हाधिकारी देसाई यांनी डिचोली मामलेदार प्रवीणजय पंडीत यांना तत्काळ सदर भागाची पाहणी करण्याची सुचना केली आहे.
शिरगाव गावातील लोकांची नळांची बीले न भरल्याने सध्या लोकांवर नळ जोडणी तोडण्याची कारवाई होण्याची शक्मयता आहे. या विषयावरून शिरगाव गावातील मोठय़ा संख्येने लोकांनी ई लिलावाची खनिज वाहतूक रोखून धरली होती. या विषयावरील बैठकीवेळी सरपंच सदानंद गावकर व इतरांनी डिचोली उपजिल्हाधिकारी सचिन देसाई यांच्या निदर्शनास वरील बाब आणून दिली. तसेच आपल्या मोबाईलवरील फोटो व व्हिडीओ दाखविले.
सदर व्हिडीओत चौगुले खाण कंपनीच्या क्षेत्रात ई लिलावाच्या मालाची उचल होत असलेल्या ठिकाणी झाडे मारण्यात आली असून डंप सोडून उत्खनन करून मालाची उचल केली जात असल्याचे दिसून येत आहे. सदर प्रकरण शनि. दि. 25 जाने. रोजी उघडकीस आले होते.
डंप सोडून जमिनीतील मालाचे उत्खनन ?
शनि. दि. 25 जाने. रोजी सकाळी पैरा जंक्शनवर शिरगावातील लोकांनी आपल्या थकलेल्या पाण्यांच्या बीलांच्या मागणीसाठी खनिज वाहतूक रोखली होती. त्या दिवशी शनिवार असल्याने सरकारी कार्यालयांना सुट्टी होती. त्यामुळे घटनास्थळी लगेच कोणी सरकारी अधिकारी दाखल होऊ शकले नव्हते. रस्त्यावर ट्रक अडविण्यात आले होते, पण खाण भागात माल काढण्याचे काम सुरूच असल्याने आंदोलकांनी आपला मोर्चा खाणीवर वळविला आणि तेथे चालु असलेले काम सर्व मशीन ऑपरेटर्सना बंद करण्यास सांगितले. त्यावेळी या आंदोलकांनी सदर खाण परिसराचा व्हिडीओ चित्रित केला असता त्याठिकाणी डंप सोडून जमिनीतील माल उत्खनन करून काढला जात असल्याचे निदर्शनास आले होते, असे सरपंच सदानंद गावकर यांनी या प्रतिनिधीशी बोलताना सांगितले.
तत्काळ पाहणी करण्याचे उपजिल्हाधिकाऱयांकडून आदेश.
हि बाब सरपंच व इतरांनी उपजिल्हाधिकारी सचिन देसाई यांच्या निदर्शनास आणून दिल्यानंतर देसाई यांनी या बैठकीस उपस्थित असलेल्या मामलेदार प्रवीणजय पंडित यांना आज मंगळ. दि. 28 जाने. रोजी तत्काळ सदर जागेची पाहणी करून अहवाल तयार करण्याची सुचना दिली. त्यानुसार आज मंगळवारी सदर खाण भागाची व उत्खननाची मामलेदारांमार्फत पाहणी होणार आहे.
जमिन उत्खननावर बंदी असतानाही मालाचे उत्खनन.
सध्या गोवा राज्यातील खाण प्रकरण न्यायप्रविष्ट असल्याने कोणत्याही खाण प्रक्रियेवर बंदी आहे. सरकार केवळ खाण कंपनींनी काढून ठेवलेले डंप ई लिलाव करून त्यांची उचल करीत आहे. असे असताना ई लिलावाच्या मालाच्या निमित्ताने प्रत्यक्षात जमिनीतील खनिज मालाचे उत्खनन समोर आलेले आहे. खनिज माल उत्खननाला बंदी असतानाही सदर प्रकार घडल्याने तो सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशाचा अवमान ठरू शकतो. आज मंगळवारी डिचोलीचे मामलेदार प्रवीणजय पंडित चौगुले खाण भागाची पाहणी करणार असून त्यानंतरच संपूर्ण चित्र स्पष्ट होणार आहे.









