एसटी सेवानिवृत्त संघटेनेचे भाजपच्या राष्ट्रीय अध्यक्षांना निवेदन
प्रतिनिधी / कुडाळ:
आमचं केंद्रात सरकार आलं, तर इपीएस 95-पेन्शनधारकांच्या पेन्शनमध्ये तीन महिन्यात वाढ करू, असे आश्वासन देणाऱया भाजपची सत्ता येऊन सात वर्षे झाली. मात्र आश्वासनपूर्ती अद्याप झालेली नाही, याकडे लक्ष वेधून ईपीएस-95 पेन्शनधारकांच्या पेन्शनमध्ये वाढ करावी, अशी मागणी करणारे निवेदन भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे. पी. नड्डा यांना पाठविण्यासाठी पक्षाचे जिल्हाध्यक्ष राजन तेली यांच्याकडे राज्य परिवहन सेवानिवृत्त कर्मचारी संघटनेचे विभागीय अध्यक्ष सदानंद आपटे यांच्या नेतृत्वाखाली सरचिटणीस मनोहर आरोलकर, प्रकाश साखरे, सदानंद रासम, दिलीप साटम यांच्या शिष्टमंडळाने दिले.
2012 मध्ये प्रकाश जावडेकर यांनी महाराष्ट्रात इपीएस 95 पेन्शनमध्ये वाढ व्हावी, यासाठी अभियान छेडले होते. तीन हजारपेक्षा जास्त निवेदने राज्यसभेत दाखल झाली होती. भगतसिंग कोश्यारी यांच्या अध्यक्षतेखाली समिती स्थापन करण्यात आली. या समितीने डिसेंबर 2013 मध्ये केंद्र सरकारला अहवाल सादर केला होता. या अहवालात मिनिमम 3000 रुपये पेन्शन देण्याची शिफारस केली होती. त्यावेळच्या सरकारने एक हजार रुपये पेन्शनचा निर्णय घेतला होता. त्या विरोधात जावडेकर यांनी त्यावेळी टीका केली होती. 2014 मध्ये दिल्ली येथील जंतर-मंतरवर झालेल्या आंदोलनात येऊन सरकार आमचं येणार आणि सरकार आल्यावर तीन महिन्यात पेन्शन वाढविणार, अशी ग्वाही भाजपने दिली होती. आज भगतसिंग कोश्यारी, प्रकाश जावडेकर सत्तेत आहेत परंतु पेन्शनवाढ झालेली नाही, असे या निवेदनात स्पष्ट करून आपण भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष आहात म्हणून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना सांगा, इपीएस 95 पेन्शन वाढवा, अशी विनंती निवेदनातून करण्यात आली आहे. आपण हे निवेदन तातडीने राष्ट्रीय अध्यक्षांना पाठवितो, असे तेली यांनी यावेळी सांगितले









