ईडी कार्यालयात ‘कोरोना’चा प्रवेश, वरिष्ठ अधिकाऱयाला कोरोनाची लागण झाल्याचे स्पष्ट, उपचार सुरू
वृत्तसंस्था/ नवी दिल्ली
राजधानी दिल्लीमध्ये कोरोना विषाणूमुळे बाधित झालेल्यांच्या संख्येने 17,000 चा टप्पा पार केला आहे. आता कोरोनाने थेट दिल्लीतील अंमलबजावणी संचलनालय (ईडी) कार्यालयात धडक दिली असल्याचे स्पष्ट झाले. शुक्रवारी ईडी कार्यालयातील एका अधिकाऱयाला कोरोनाची लागण झाल्याचा अहवाल आल्याने खळबळ माजली. सदर अधिकारी 18 मे रोजी ईडी कार्यालयात आला होता. त्यानंतर त्याला कोरोनाची लक्षणे आढळल्याने रुग्णालयात दाखल करण्यात आले. त्याच्या संपर्कात आलेल्या व्यक्तींना होम क्वारंटाईन करण्याचे आदेश देण्यात आले आहेत.
दिल्लीमध्ये कोरोनाच्या रुग्णांमध्ये झपाटय़ाने वाढ होताना दिसत आहे. शुक्रवारी दिल्लीत 1106 नवीन रुग्ण आढळल्याने राज्यातील आरोग्य यंत्रणा हादरली. उपमुख्यमंत्री मनीष सिसोदिया आणि आरोग्य मंत्री सत्येंद्र जैन यांनी पत्रकार परिषद घेऊन याबाबतची माहिती दिली. नागरिकांनी कोरोनामुळे घाबरून जाऊ नये, मात्र सतर्कता जरूर बाळगावी, असे आवाहन सिसोदिया यांनी केले आहे.
प्रशासकीय कार्यालयांच्या सुरक्षेसाठी कोणती उपाययोजना करता येईल यावर आता दिल्ली सरकार विचार करत आहे. सोशल डिस्टन्सिंगचा नियम कसोशीने पाळण्याचा आदेश अधिकाऱयांना देण्यात आला असून उपस्थितीही कमी राखण्याची सूचना करण्यात आली आहे.
50 टक्क्याहून अधिक रुग्ण बरे
मागील 34 दिवसात 69 लोकांचा कोरोनामुळे मृत्यू झाला होता. एकीकडे कोरोनाच्या रुग्णांची संख्या वाढत असली तरी 50 टक्क्याहून अधिक रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत. वैद्यकीय अहवाल उशिरा आल्यामुळे काही जणांचा मृत्यू झाल्याचे उपमुख्यमंत्री सिसोदिया यांनी सांगितले.