इस्लामिक सहकार संघटनेत भारताला बदनाम करण्यासाठी रचलेल्या कावेबाजीत इम्रान खान पुन्हा एकदा सपशेल अपयशी ठरला. तुर्कस्तानची बाजू राखण्याचा प्रयत्न करणाऱया पाकिस्तानला सौदी अरेबिया आणि संयुक्त अरब अमिरातीने तोंडघशी पाडले. तर मालदीवने पाकिस्तानच्या चालीतील हवाच काढून घेतली.
संयुक्त राष्ट्र संघात इस्लामिक देशांची व्यूहरचना आखण्यासाठी 19 मे 2020 रोजी इस्लामिक सहकार संघटनेच्या सदस्य राष्ट्रांच्या युनोतील राजदूतांसाठी बैठकीचे आयोजन केले होते. संघटनेचे युनोतील धोरण ठरविण्यासाठी ही बैठक आयोजित केली होती. या बैठकीत भारतविरोधी मत निर्माण करण्यासाठी पाकिस्तानने दोन महिन्यांपासून जय्यत तयारी सुरु केली. भारतात मुस्लिम विरोधी वातावरणात तयार होत असून तेथील मुसलमान जनतेचे जीवन धोक्यात असल्याचा प्रचार सुरु केला होता. भारतातील नागरिकत्व कायदा, काश्मिरमधील 370 कलमाची हद्दपारी, इत्यादी मुद्यांचा आधार घेऊन पाकिस्तानी गुप्तचर यंत्रणा आयएसआयने सोशल मिडीया आणि प्रसार माध्यमातून भारतात मुसलमानविरोधात जोरदार मोहिम सुरु असल्याची आवई उठविणारे संदेश प्रसारीत केले. पाकिस्तानच्या या प्रयत्नांना यशही मिळत गेले. आखाती देशांत भारतविरोधी वातावरण निर्मिती होऊ लागली. यात भर पडली ती भारतातील कोरोनाविरोधातील युद्धाची.
बेसावधपणे वार
मार्च महिन्यांत कोरोनाचा उद्रेक झाला. भारतात कोरोनाला अटकाव करण्यासाठी 25 एप्रिलपासून जमावबंदीसहीत लॉकडाऊन सुरु झाले. 30 मार्च रोजी जमावबंदीचा आदेश धुडकावणाऱया दिल्लीतील निजामुद्दीन मरकज येथून तब्लिगी जमातच्या शेकडो कार्यकर्त्यांना बाहेर काढून त्यांना विलगीकरणात ठेवले. तब्लिगी जमातच्या या हरकतीने भारतात त्यांच्याविरोधात एकच लाट उठली होती. त्याचा फायदा घेत आयएसआयच्या आयटी सेलने त्याचा उलटा प्रचार आखाती देशांत पसरवला. त्याची दखल घेऊन इस्लामिक सहकार संघटनेने निषेधाचा सूर उठवला. मे महिन्यातील पहिल्याच आठवडय़ातील या घडामोडींनी भारत सरकारला जाग आली. कोरोनाला अटकाव करण्यासाठी भारत सरकारची सर्व यंत्रणा राबत होती. लॉकडाऊन सुरु झाल्यानंतर जीवनावश्यक वस्तूंचा पुरवठा आदी कामांवर सर्व यंत्रणांचे लक्ष केंद्रीत झाले होते. विदेश मंत्रालय जगाच्या कानाकोपऱयांत अडकून पडलेल्या भारतीयांना परत आणण्याच्या कामांत गुंतलेले असतानाच पाकिस्तानचे षडयंत्र यशस्वी होत होते.
महामारीतही कुटनीतीची शिकस्त
इस्लामिक सहकार संघटनेने भारतविरोधी सूर लावण्यास सुरुवात करताच विदेशमंत्री जयशंकर यांनी युद्धपातळीवर त्याचा बिमोड करण्यास हालचाली सुरु केल्या. यात पाकिस्तानी आयएसआयने आखाती देशांतील राजपुत्र आणि राजपुत्रीच्या नावाने सुरु केलेली सोशल खाती जगासमोर उघड केली. सोशल मिडियावर फिरत असलेल्या संदेशांवर स्पष्टीकरण भारताच्या विदेश मंत्रालयांकडून आखातातील संबंधीत अतिमहनीय व्यक्तिंना पाठविण्यात आल्यानंतर पाकिस्तानचा खोटारडेपणा उघड झाला. यात ओमानच्या राजपुत्रीने आपल्या अधिकृत सोशल मिडिया खात्याद्वारे बनावट सोशल मिडिया खात्यावरून त्यांच्या नावाने भारतविरोधी संदेशाचा पर्दापाश केल्याने आयएसआयचे पितळ उघड झाले. भारताच्या परराष्ट्र मंत्रालयाच्या प्रखर धोरणामुळे संयुक्त अरब अमिरातीने भारतविरोधातील आपले वक्तव्य मागे घेतले. पाकिस्तानच्या या हरकतींचा प्रतिकूल परिणाम 19 मे रोजी युनोतील बैठकीवर झाला.
अमिरातीकडून तांत्रिक अडचण
युनोतील इस्लामिक राष्ट्रांचे राजदूत यांना एकत्र आणण्यासाठी बोलावलेल्या बैठकीत पाकिस्तानने भारतविरोधी अनौपचारीक गट बनविण्याचा विचार चालविला होता. त्यासाठी आपला लिखित ठराव संघटनेचे अध्यक्ष असलेल्या संयुक्त अरब अमिरातीला सादर केल्याचा सुगावा भारत सरकारला लागला होता. पाकिस्तानच्या या उचापतीला प्रत्यूत्तर देण्यासाठी इस्लामिक सहकार संघटनेतील सदस्यांचा आधार घेतला. भारतविरोधी प्रचारासाठी वापरलेल्या भारतातील घटनांचा पुराव्यासहीत खुलासा करून पाकिस्तानाचा डाव उधळून लावला. त्याची फलश्रुती म्हणून संघटनेच्या चेअरमनपदावर असलेल्या युएईने तांत्रिक मुद्दा उपस्थित करून युनोच्या राजदूतांच्या बैठकीत यावर विचार होण्यापूर्वी सदर बाब संघटनेचे सदस्य असलेल्या परराष्ट्र मंत्र्यांच्या बैठकीत मांडणे गरजेचे असल्याचे स्पष्ट केले. त्याच्यापुढे जाऊन मालदीवच्या राजदूतांनी पाकिस्तानी ठरावावर हरकतीचा मुद्दा उपस्थित केल्याने आयएसआयची पुरती फजिती झाली.
मालदीवची हरकत फलदायी
भारतात मुसलमानांवर अत्याचार होत असल्याने इस्लामिक सहकार संघटनेच्या युनोतील सर्व राजदूतांनी, भारताला युनोच्या व्यासपीठावर बहिष्कृत करावे, असा ठराव मांडला. या संघटनेचे 57 इस्लामिक देश सदस्य असून सर्व सदस्य देशांच्या राजदूतांनी बहिष्काराचे अस्त्र उभारल्यास भारताला युनोच्या व्यासपीठावर कोणत्याही देशाचे पाठबळ लाभणार नाही. परिणामी भारत संयुक्त राष्ट्र संघटनेत एकाकी पडणार असल्याची दिवास्वप्ने पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांनी पाहिली होती. पाकिस्तानचे हे कारस्थान निस्तेज करण्यासाठी भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर यांनी तत्परतेने आपले डावपेच मांडले. डावपेचांना यश लाभले. मालदीवच्या राजदूतांनी पाकिस्तानच्या ठरावाला हरकत घेत भारतात 20 कोटीपेक्षा अधिक मुसलमान वास्तव्य करत असल्याचे नजरेस आणून दिले. भारताला बहिष्कृत करत असताना इस्लामिक सहकार संघटना तेथील 20 कोटी मुस्लिम जनतेलाही बहिष्कृत करत असल्याची भावना निर्माण होईल असा युक्तिवाद मालदीवने मांडला. मालदीवच्या या सडेतोड युक्तिवादाला संयुक्त अरब अमिरात आणि सौदी अरेबियाच्या प्रतिनिधींनी पाठिंबा दर्शविल्याने इम्रानचे दिवास्वप्न उध्वस्त
झाले.
तुर्कस्तानची संगत भोवली

तुर्कस्तान आणि मलेशियाने संयुक्त राष्ट्र संघाच्या सप्टेंबर 2019 मध्ये झालेल्या आमसभेत काश्मिर प्रश्नावर भारतविरोधी भाषणबाजी केली होती. त्यानंतर इस्लामिक सहकार संघटनेवरील सौदी अरेबियाच्या वर्चस्वाला आव्हान देण्यासाठी मलेशियाचे पंतप्रधान महाथीर महंमद यांनी सौदी विरोधी तुर्कस्तान, कतार, इराण आदी देशांची इस्लामिक शिखर परिषद बोलावली. अर्थात यात इम्रान खान यांना खास आमंत्रण होतेच. पण सौदी अरेबियाचे राजपुत्र महंमद बिन सलमान यांनी त्याची अडवणूक केल्याने परिषदेला अवघे 11 तास बाकी असताना आपला दौरा रद्द करण्याची वेळ इम्रानवर आली होती. यावेळी तुर्कस्तानने लिबियाच्या प्रश्नावर पाकिस्तानला चकवून आपल्या जाळय़ात ओढले. पाकिस्तानचा नाईलाज होता. लिबियातील सत्तास्थापनेच्या संघर्षात तुर्कस्तान आणि संयुक्त अरब अमिरात यांच्यात गेल्या सहा महिन्यांपासून प्रचंढ तणाव सुरु आहे. अशा या स्थितीत अमिरातीचे राजे पाकिस्तानवर प्रचंड संतापलेले आहेत. लिबियातील वादळ घोंगावत असतानाच इस्लामिक संघटनेच्या पटलावर पाकिस्तानने मांडलेला भारतविरोधी ठराव, मालदीवकडून बाद ठरविला. खरेतर ही सौदी अरेबिया आणि संयुक्त अरब अमिरातीने पंतप्रधान इम्रान खान यांना घातलेली गुगलीच होती.
कोरोनाच्या धामधुमीत चीन आणि पाकिस्तानने देशाच्या सीमेवर चालविलेल्या हरकतीने नरेंद्र मोदी सरकारवर प्रचंढ दबाव वाढलेला आहे. अशा या अटीतटीच्या लढाईतही भारताने आपल्या इस्लामिक जगतातील मित्र राष्ट्रांच्या साथीने पाकिस्तानच्या एका आंतरराष्ट्रीय षढयंत्राचा बिमोड केला. भारताने इस्लामिक संघटनेतही व्हेटोचा वापर केल्याची, पाकिस्तानी पंतप्रधान इम्रान खान यांनी व्यक्त केलेली खंत, भारताच्या यशस्वी कुटनीतीची ग्वाही देत आहे.
– पी. कामत









