जगात कोरोना विषाणूच्या संसर्गामुळे आतापर्यंत 2 लाख 52 हजार 747 जणांचा मृत्यू झाला आहे. जगभरात 36,63,222 जणांना कोरोनाची लागण झाली आहे. तर 12 लाख 05 हजार 650 रुग्णांनी कोरोनावर मात करण्यास यश मिळविले आहे. इस्रायलच्या डिफेन्स बायोलॉजिकल इन्स्टीटय़ूटने कोरोनावरील लस विकसित केल्याची माहिती संरक्षणमंत्री नेफ्टली बॅन्नेट यांनी दिली आहे. या इन्स्टीटय़ूटने विषाणूचा संसर्ग नष्ट करण्यासाठी अँटीबॉडी तयार करण्यास यश मिळविले आहे. लसीच्या विकासाचा टप्पा पूर्ण झाला आहे. आता याचे पेटंट आणि मोठय़ा प्रमाणावर उत्पादनाची तयारी केली जात आहे. ही अँटीबॉडी मोनोक्लोनल पद्धतीने विषाणूवर आक्रमण करत असल्याचे समोर आले आहे.
मांसबाजारातूनच विषाणूचा फैलाव

कोरोना विषाणूचा उगम चीनच्या वेट मार्केटमधूनच (मांसबाजार) झाल्याची दाट शक्यता आहे. तसेच या शक्यतेची समीक्षा केली जावी. कोरोना विषाणू प्रयोगशाळेत तयार झाल्याचा अमेरिका दावा योग्य वाटत नाही. परंतु अमेरिकेसोबत मिळून यासंबंधी संशोधनावर काम सुरू असल्याची माहिती ऑस्ट्रेलियाचे पंतप्रधान स्कॉट मॉरिसन यांनी दिली आहे. ऑस्ट्रेलियात कोरोनाची साथ आता नियंत्रणात असून संसर्गाचा दर लक्षणीयरित्या घटल्याने निर्बंध शिथिल करण्यात येत आहेत.
कॅनडाला हायड्रॉक्सी क्लोरोक्वीनचा पुरवठा

भारताकडून हायड्रॉक्सी क्लोरोक्वीनच्या 50 लाख गोळय़ांची पहिली खेप टोरंटो येथे पोहोचल्याची माहिती भारतीय दूतावासाने दिली आहे. या महत्त्वपूर्ण काळात भारत-कॅनडा सहकार्य सुरू आहे. कॅनडात कोरोनाबाधितांची संख्या 60 हजारांपेक्षा अधिक झाली आहे. तर मृतांची संख्या 3,854 झाली आहे. देशातील क्यूबेक प्रांत महामारीने सर्वाधिक ग्रस्त आहे. तेथील रुग्णांचा आकडा 32,623 वर पोहोचला असून 2,250 जणांचा मृत्यू झाला आहे. क्यूबेक प्रांतात मंगळवारपासून अर्थव्यवस्थेचे काही भाग खुले करण्यात आले आहेत.
अमेरिका : दिवसात 1,050 बळी

अमेरिकेत मागील 24 तासांमध्ये 1,050 जणांचा मृत्यू झाला असून 24 हजारांपेक्षा अधिक नवे रुग्ण सापडले आहेत. अमेरिकेतील एकूण रुग्णांची संख्या 12,12,955 झाली आहे. देशात 1 जूनपर्यंत प्रतिदिन मृतांचा आकडा 3 हजार राहू शकतो असे सेंटर फॉर डिसिज कंट्रोल अँड प्रिव्हेंशनच्या (सीडीसी) एका अंतर्गत अहवालात नमूद आहे. मेच्या अखेरपर्यंत प्रतिदिन 2 लाख नवे रुग्ण मिळण्याची शक्यता आहे. परंतु व्हाइट हाउसने हा अहवाल वादग्रस्त असल्याचे म्हटले आहे.
अमेरिकेकडून मोठा मदतनिधी

ऑगस्टमध्ये अमेरिकेत 1 लाख 30 हजारांपेक्षा अधिक जणांचा मृत्यू होऊ शकतो. हा आकडा सद्यकाळातील संख्येच्या दुप्पट असणार आहे. सद्यकाळात आतापर्यंत 69 हजार 925 जणांचा मृत्यू झाल्याचे सिएटल येथील इन्स्टीटय़ूट फॉर हेल्थ मॅट्रिक्स अँड इव्हॅल्युएशनने म्हटले आहे. अमेरिकेने आरोग्य सुविधा आणि लोकांना दिलासा देण्यासाठी 3 ट्रिलियन डॉलर्सच्या मदतनिधीला मंजुरी आहे. कोरोना संकटाच्या पार्श्वभूमीवर मदतनिधी जाहीर केल्याने अमेरिकेचा खर्च बऱयाच प्रमाणात वाढला आहे. मदतनिधीचा आकडा देशाच्या अर्थव्यवस्थेच्या 14 टक्के इतका आहे. तसेच यामुळे अमेरिकेवर 25 ट्रिलियन डॉलर्सचे कर्ज होणार आहे. लॉकडाउनमुळे अमेरिकेत 3 कोटी लोक बेरोजगार झाले आहेत.
नाइकीकडून महत्त्वाची घोषणा

नाइकी कंपनी अमेरिकेतील आरोग्य कर्मचाऱयांसाठी तयार करण्यात आलेली 30 हजार पादत्राणे दान करणार आहे. एअर जूम पल्स नावाचे उत्पादन नोव्हेंबर महिन्यात सादर करण्यात आले होते. आरोग्य कर्मचाऱयांसाठी कंपनीने तयार केलेले हे पहिलेच उत्पादन आहे. न्यूयॉर्क आणि लॉस एंजिलिसमध्ये आरोग्य कर्मचाऱयांना सुमारे 95,000 सॉक्स देखील पाठविले जाणार असल्याचे कंपनीने म्हटले आहे.
इटलीत 29 हजारांहून अधिक बळी

इटलीत कोरोनामुळे आतापर्यंत 29,079 जणांना जीव गमवावा लागला आहे. तर बाधितांचा आकडा 2,11,938 वर पोहोचला आहे. मागील 24 तासांत 195 जणांचा मृत्यू झाला आहे. रविवारच्या तुलनेत सोमवारी मृतांच्या संख्येत वाढ दिसून आली आहे. रविवारी कोरोनामुळे 174 रुग्णांचा मृत्यू झाला होता. देशात 3 मेपर्यंत टाळेबंदी लागू करण्यात आली होती. परंतु आता काही दुकाने सुरू करण्याची अनुमती देण्यात आली आहे. इटलीत 21 फेब्रुवारी रोजी पहिला रुग्ण सापडला होता.
जपानमध्ये रुग्ण वाढतेच

जपानमध्ये दिवसभरात 174 नवे कोरोनाबाधित सापडले असून 11 जणांना जीव गमवावा लागल्याची माहिती आरोग्य मंत्र्यांनी दिली आहे. देशात आतापर्यंत 15 हजार 78 रुग्ण सापडले असून 536 जणांचा मृत्यू झाला आहे. जपानमध्ये प्रारंभिक काळात कोरोना संसर्गावर चांगले नियंत्रण मिळविले होते. परंतु काही काळानंतर जपानमध्ये आता कोरोनाबाधितांची संख्या वाढू लागल्याने आणीबाणी लागू करावी लागली आहे.
मेक्सिकोत 117 जणांचा मृत्यू

मेक्सिकोत मागील 24 तासांत 1,434 नवे रुग्ण सापडले आहेत. देशातील एकूण बाधितांचा आकडा आता 24,905 झाला आहे. तर मृतांची संख्या वाढून 2,271 वर पोहोचली आहे. सरकारने महामारी रोखण्यासाठी 16 एप्रिल रोजी देशात टाळेबंदी लागू करण्याची घोषणा केली होती. टाळेबंदीचा कालवधी आता 30 मेपर्यंत वाढविण्यात आला आहे. परंतु कमी संसर्ग असलेल्या शहरांमध्ये 17 मेपासून घरातच थांबण्यासंबंधीचा आदेश मागे घेतला जाऊ शकतो.
तुर्कस्तानात निर्बंध शिथिल

तुर्कस्तानात 15 मेपर्यंत अनेक निर्बंध शिथिल केले जाणार आहेत. सलून, काही दुकाने आणि मार्केटिंग सेंटर 11 मेपर्यंत सुरू करता येणार आहेत. परंतु विद्यापीठे 15 मेपर्यंत बंदच राहणार आहेत. 10 मेनंतर 65 वर्षीय ज्येष्ठ नागरिक घराबाहेर पडू शकतील. अध्यक्ष रेसेप तैयप एर्दोगान यांनी मागील महिन्यात सुमारे 31 शहरांमध्ये संचारबंदी लागू केली होती. तुर्कस्तानात 1 लाख 27 हजार 659 जणांना कोरोनाची बाधा झाली असून 3,461 रुग्णांना जीव गमवावा लागला आहे.
फ्रान्स : 11 मेपासून शिथिलता

फ्रान्समध्ये 11 मेपासून अनेक निर्बंध शिथिल केले जाणार आहे. तसेच पुढील काळात संसर्गाची स्थिती पाहून निर्णय घेतले जाणार आहेत. परंतु धार्मिक कार्यक्रमांवरील बंदी 2 जूनपर्यंत कायम राहणार आहे. फ्रान्समध्ये आतापर्यंत 25,201 जणांचा मृत्यू झाला असून 1 लाख 69 हजार 462 जणांना कोरोनाची लागण झाली आहे.








