युएईचा दौरा : दोन्ही देशांदरम्यान सायबर सुरक्षेसह अनेक करार
वृत्तसंस्था / अबुधाबी
इस्रायलचे पंतप्रधान नफ्ताली बेनेट यांनी इतिहास रचला आहे. 1948 मध्ये स्थापन झालेल्या इस्रायलच्या पंतप्रधानांनी पहिल्यांदाच एखाद्या अरब देशाचा अधिकृत दौरा केला आहे. रविवारी रात्री उशिरा बेनेट हे अबुधाबी येथे पोहोचले. संयुक्त अरब अमिरातचे विदेशमंत्री अब्दुल्ला बिन जाएद यांनी त्यांचे स्वागत केले. अब्दुल्ला हे युएईच्या युवराजांचे कनिष्ठ बंधू आहेत. बेनेट यांना युएईकडून मानवंदना देखील देण्यात आली. आम्ही केवळ शेजारी नव्हे तर भाऊ देखील आहोत असे युएईचे नेतृत्व आणि येथील लोकांना सांगू इच्छितो असे बेनेट यांनी यावेळी म्हटले आहे.
या दौऱयात दोन्ही देशांदरम्यान अनेक करार झाले आहेत. यात सायबर सुरक्षेशी निगडित करार आहे. तसेच कोटय़वधी डॉलर्सचा व्यापार करार अन् अन्य क्षेत्रांकरताही करार करण्यात आले आहेत.
युवराजांसोबत दीर्घ चर्चा
बेनेट हे विशेष विमानाने रविवारी रात्री अबुधाबीच्या विमानतळावर पोहोचले. त्यानंतर ते युवराजांच्या महालात दाखल झाले. युएईचे युवराज शेख मोहम्मद बिन जायए अल नाहयान अन् बेनेट यांची तेथे भेट झाली. या भेटीदरम्यान दोन्ही देशांचे शिष्टमंडळ उपस्थित होते. या भेटीनंतर शिष्टमंडळ स्तरीय चर्चा सुरू झाली. तर सोमवारी अनेक करारांवर स्वाक्षरी करण्यात आली. यादरम्यान बेनेट यांनी संयुक्त अरब अमिरातमधील उद्योग तसेच अत्याधुनिक तंत्रज्ञान मंत्री सुल्तान अहमद अल जबेर यांच्याशी चर्चा केली.
वृत्तसंस्थेला मुलाखत
गाठीभेटींचे सत्र संपल्यावर बेनेट यांनी युएईची वृत्तसंस्था डब्ल्यूएएमला मुलाखत दिली आहे. मागील वर्षी अब्राहम करार झाल्यावर आम्ही नवी सुरुवात केली आहे. आता आम्ही राजनयिक, आर्थिक आणि सांस्कृतिक क्षेत्रात मजबूत संबंध निर्माण करणार आहोत. व्यापार, संशोधन, विकास, सायबर सुरक्षा, शिक्षण आणि नागरी उड्डाण क्षेत्राकरता मोठे करार केले आहेत. या करारांमुळे इस्रायल आणि युएईसह या क्षेत्रातील अन्य देशांनाही लाभ होणार असल्याचे बेनेट यांनी मुलाखतीत नमूद केले आहे.
युएईच्या लोकांचे मानले आभार
युएईचे नेतृत्व आणि येथील लोकांकडून करण्यात आलेल्या स्वागतासाठी आभारी आहे. कुठल्याही इस्रायली पंतप्रधानांचा हा पहिला युएई दौरा असल्याने अत्यंत उत्साही आहे. हे संबंध आता वेगाने मजबुतीसह वृद्धींगत होणार असल्याचे बेनेट म्हणाले.
इराणचा धोका
इस्रायल आणि युएईसह अन्य काही देशांना इराणच्या आण्विक कार्यक्रमापासून धोका आहे. या गोष्टीचा उल्लेख दोन्ही देशांनी केला नसला तरीही या नव्या संबंधांचा पाया इराणविरोधातच रचला गेला आहे. इराणला अण्वस्त्रसज्ज होण्यापासून रोखण्यासाठी इस्रायल प्रयत्नशील आहे. युएईसह बहारीन, सूदान आणि मोरक्को हे देश देखील अब्राहम करारात सामील आहेत. जॉर्डन आणि कतारने यापूर्वीच इस्रायलला मान्यता दिली आहे.









