न्यूझीलंड दौऱयाच्या पार्श्वभूमीवर भारतीय संघाला धक्का
नवी दिल्ली / वृत्तसंस्था
भारताचा आघाडीचा जलद गोलंदाज इशांत शर्माला रणजी लढतीत गोलंदाजी करत असताना गुडघ्याची दुखापत झाली असून यामुळे आगामी न्यूझीलंड दौऱयातील कसोटी मालिकेत त्याचा सहभाग अनिश्चिततेच्या भोवऱयात सापडला आहे. दिल्लीच्या गोलंदाजीची धुरा सांभाळत असताना विदर्भविरुद्ध दुसऱया डावातील पाचवे षटक टाकत असताना त्याला या दुखापतीला सामोरे जावे लागले.
इशांतने प्रतिस्पर्धी कर्णधार फैज फजलला टाकलेला चेंडू त्याच्या पॅडवर आदळला आणि पंचांकडे वळत अपील करत असताना इशांत अचानक खाली कोसळला. यावेळी गुडघ्याला त्याला प्रचंड वेदना झाल्या आणि सहायक पथकाला पाचारण करावे लागले.
‘इशांतचा गुडघा दुखावला असून त्याला वेदना जाणवत आहेत. आम्ही या सामन्यात त्याला आणखी खेळवण्याचा धोका स्वीकारु इच्छित नाही. त्याला प्रॅक्चर झाले नसेल, अशी आम्हाला आशा आहे’, असे दिल्ली संघव्यवस्थापनातील एका सदस्याने गोपनियतेच्या अटीवर वृत्तसंस्थेला सांगितले.
‘फक्त वेदना होत असतील तर इशांत काही दिवसांच्या विश्रांतीनंतर पूर्ण तंदुरुस्त होईल. अर्थातच, त्याला राष्ट्रीय क्रिकेट अकादमीत जावे लागेल आणि पुन्हा पूर्ण सज्जतेने खेळण्यासाठी आपण तयार असल्याचा दाखला घ्यावा लागेल. सध्या आम्ही त्याच्या एमआरआय अहवालाच्या प्रतिक्षेत आहोत’, असे या सदस्याने पुढे नमूद केले.
इशांतने आतापर्यंतच्या कारकिर्दीत 96 कसोटी सामने खेळले असून न्यूझीलंडविरुद्ध पहिल्या कसोटी सामन्यापूर्वी तो पूर्ण तंदुरुस्त असणे अपेक्षित आहे. भारतीय संघ न्यूझीलंड दौऱयात दि. 21 ते 25 फेब्रुवारी या कालावधीत पहिला तर दि. 29 फेब्रुवारी ते 4 मार्च या कालावधीत दुसरा कसोटी सामना खेळणार आहे.









