ऑनलाईन टीम / गाझियाबाद :
कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर इराणमध्ये अडकलेल्या भारतीयांना एअरलिफ्ट करुन भारतात आणण्यात आले आहे. भारतीय हवाईदलाचे सी-17 ग्लोबमास्टर हे विमान आज पहिल्या बॅचमधील 58 जणांना घेऊन भारतात दाखल झाले आहे.
गाझियाबादच्या हिंडन एअरफोर्स स्टेशनवर सी-17 ग्लोबमास्टर या विमानाचे लॅन्डिंग झाले आहे. सोमवारी रात्री भारतीय हवाईदलाच्या सी-17 ग्लोबमास्टर विमानाने रात्री 8.30 वाजता इरामच्या तेहरानसाठी उड्डाण केले होते. आज पहिल्या टप्प्यातील 58 जणांना घेऊन हे विमान परतले. या विमानात सर्व मेडिकल सुविधा पुरविण्यात आल्या होत्या. भारतात परतलेल्या नागरिकांना 14 दिवस हिंडनमध्येच देखरेखीखाली ठेवण्यात येणार आहे.
इराणमध्ये कोरोनाने आतापर्यंत 237 जणांचा बळी घेतला आहे. तर 7161 जणांना या विषाणूची लागण झाली आहे. त्यामुळे खबरदारीचा उपाय म्हणून इराणमध्ये अडकलेल्या भारतीयांना मायदेशी आणण्यात येत आहे. अजूनही 1200 भारतीय अडकले आहेत.