युरो चषक फुटबॉल चॅम्पियनशिप
वेम्बले / वृत्तसंस्था
युरो चषक स्पर्धेच्या पहिल्या उपांत्य लढतीत उद्या (बुधवार दि. 7) इटली-स्पेन हे बलाढय़ संघ आमनेसामने उभे ठाकत आहेत. दोन्ही संघ आतापर्यंत अपराजित असून हीच घोडदौड या लढतीतही कायम राखण्याचा त्यांचा प्रयत्न असेल. भारतीय प्रमाणवेळेनुसार रात्री 12.30 वाजता या सामन्याला सुरुवात होईल.
युरोप खंडातील पारंपरिक ताकदवान संघ म्हणून इटालियन ब्रिगेड ओळखली जाते. ते सप्टेंबर 2018 पासून सलग 32 सामन्यांपासून अपराजित आहेत. इटलीने साखळी फेरीत एकही गोल न स्वीकारता दमदार विजय संपादन केले. शिवाय, उपउपांत्यपूर्व फेरीत ऑस्ट्रियाचा अपेक्षेपेक्षा अधिक सहजतेने फडशा पाडला. नंतर उपांत्यपूर्व फेरीत अव्वलमानांकित बेल्जियमला देखील धक्का देत त्यांनी आपली आगेकूच कायम ठेवली.
स्पेनचा संघ देखील उत्तम बहरात असून त्यांनी मागील 29 सामन्यात केवळ एकच पराभव स्वीकारला आहे. मात्र, इटालियन ब्रिगेड येथे त्यांची कसून परीक्षा घेत असेल तर त्यात आश्चर्याचे कारण नसेल. रॉबर्टो मॅन्सिनी यांनी मे 2018 मध्ये सूत्रे स्वीकारल्यानंतर या संघात बरेच फेरबदल झाले आहेत.
सेंटरबॅक लिओनार्डो व जॉर्जिओ शेलिनी यांनी साधारणपणे दशकभरापासून लक्षवेधी योगदान दिले असून त्यांची कामगिरी येथे पुन्हा एकदा महत्त्वपूर्ण ठरु शकते.
स्पेनची भिस्त प्रेंचमन लॅपोर्टेवर!

एकीकडे, इटलीचा संघ पूर्ण ताकदीने वर्चस्व गाजवत असताना दुसरीकडे, स्पॅनिश संघ देखील फारसा मागे नाही. उलटपक्षी, प्रारंभीच एखादा धक्का देत ते पूर्ण सामन्यात इटलीवर दडपण राखण्यासाठी प्रयत्नशील असू शकतात. सेंटरबॅक एमेरिक लॅपोर्टेने अलीकडेच फ्रान्सला अलविदा करत स्पॅनिश नागरिकत्व घेतले असून त्याच्यावर स्पेनची बरीच भिस्त असेल.
आक्रमणाच्या निकषावर स्ट्रायकर ऍल्वारो मोराटा अद्याप झगडत असल्याने स्पॅनिश प्रशिक्षक लुईस एनरिक्यू यांना पहिल्या पसंतीचे विंगर्स ठरवणे कठीण गेले आहे. इटलीकडे मात्र स्ट्रायकर इम्मोबाईल व वाईड फॉरवर्ड लोरेन्झो इनसिने असे दोन दिग्गज खेळाडू आपली जबाबदारी चोख पार पाडत आहेत.
मिडफिल्डमध्ये स्पेन सरस
एकीकडे, इटली आक्रमणात सरस आहे तर मिडफिल्डमध्ये स्पेनची बाजू अधिक वरचढ आहे. खऱया अर्थाने मिडफिल्डर्सच्या कामगिरीवर या सामन्याचे बरेचसे चित्र स्पष्ट होऊ शकते. जॉर्गिन्हो, निकोलो बरेला, मार्को विरुद्ध सर्जिओ बुस्केटस्, पेड्री गोन्झालेझ, कोके यांच्यात जुगलबंदी रंगू शकते. एकंदरीत, इटली आक्रमणात तर स्पेनचा संघ बॉल पझेशनच्या आघाडीवर सरस ठरु शकतो. मात्र, मिळालेल्या संधीचे गोलमध्ये रुपांतर करणारा संघच बाजी मारेल, हे निश्चित आहे.









