झुरिच / वृत्तसंस्था
युरोपियन चॅम्पियन इटली व ख्रिस्तियानो रोनाल्डोचा पोर्तुगाल संघ वर्ल्डकपमधील एकाच क्वॉलिफाईंग प्ले-ऑफ बॅकेटमध्ये आले असून यामुळे पुढील वर्षी कतारमध्ये होणाऱया फिफा फुटबॉल विश्वचषक स्पर्धेत या दोनपैकी एका संघाला खेळता येणार नाही, हे स्पष्ट झाले आहे.
पुढील मार्चमध्ये इटलीचा संघ घरच्या मैदानावर उत्तर मॅसेडोनियाविरुद्ध प्ले-ऑफ सेमीफायनल खेळेल आणि यातील विजेता संघा वर्ल्डकपमधील जागेसाठी पोर्तुगाल किंवा तुर्की यांच्यापैकी एका संघाविरुद्ध लढणार आहे. इटलीचा संघ यापूर्वी 2018 विश्वचषक स्पर्धेसाठी पात्र ठरला नव्हता. त्यांना प्ले-ऑफमध्ये स्वीडनविरुद्ध पराभव पत्करावा लागल्याने विश्वचषक सहभागास मुकावे लागले होते. आता सलग दुसऱयांदा वर्ल्डकपमधून बाहेर होण्याची नामुष्की टाळण्यासाठी त्यांना कोणत्याही परिस्थितीत रोनाल्डो व पोर्तुगालला नमवण्याचा पराक्रम गाजवावा लागेल.
रोनाल्डोच्या कारकिर्दीत पोर्तुगालने वर्ल्डकपसाठी नेहमीच पात्रता संपादन केली आहे. रोनाल्डोने आपला पहिला वर्ल्डकप 2006 मध्ये खेळला. 12 संघांच्या ड्रॉमध्ये स्कॉटलंडचा सामना युक्रेनविरुद्ध होणार असून यातील विजेता संघ ब्रॅकेट फायनलमध्ये वेल्स किंवा ऑस्ट्रेलियाविरुद्ध लढत देईल. 6 प्ले-ऑफ सेमीफायनल सिंगल-लेग एलिमिनेशन म्हणून दि. 24 मार्च रोजी खेळवले जातील. त्यानंतर पाच दिवसांच्या अंतराने तीन फायनल्स होणार आहेत.
यातील 3 विजेते संघ कतार वर्ल्डकपमधील 32 संघांच्या लाईनअपमध्ये युरोपच्या 13 एन्ट्रीजमधून समाविष्ट होणार आहेत. फिफा या स्पर्धेचा मुख्य ड्रॉ दि. 1 एप्रिल रोजी दोहा येथे काढणार आहे.









