1982 मधील स्पर्धेत हॅट्ट्रिकसह 6 गोल नोंदवण्याचा केला होता पराक्रम
वृत्तसंस्था/ रोम
अर्जेन्टिनाचे महान फुटबॉलपटू दिएगो माराडोना यांच्यानंतर फुटबॉल विश्वातील आणखी एक तारा निखळला असून 1982 मध्ये फिफा विश्वचषक इटलीला मिळवून देण्यात मोलाची भूमिका बजावलेले पावलो रॉस्सी यांचे असाध्य आजाराने गुरुवारी निधन झाले. ते 64 वर्षांचे होते. निवृत्तीनंतर त्यांनी फुटबॉल समालोचनाचेही काम केले आहे.
इटलीची टीव्ही वाहिनी आरएआय स्पोर्टने त्यांच्या निधनाचे वृत्त दिले. याच वाहिनीसाठी ते समालोचनाचे काम करीत होते. या वाहिनीचे निवेदक एन्रिक व्हॅराईल यांनी हे वृत्त देताना त्यांच्या निधनाचे कारण उघड केले नाही. रॉस्सी यांच्यावर 1980 मध्ये बेटिंगप्रकरणात बंदी घालण्यात आली होती. त्यानंतर पुनरागन केल्यानंतर 1982 मध्ये इटलीला विश्वचषक जेतेपद मिळवून देण्यात त्यांनी महत्त्वाची भूमिका निभावली. स्पेनमध्ये झालेल्या या स्पर्धेत रॉस्सी यांनी एकूण 6 गोल नोंदवले. त्यात ब्राझीलविरुद्धच्या लढतीतील हॅट्ट्रिक आणि पश्चिम जर्मनीविरुद्धच्या अंतिम लढतीत नोंदवलेल्या पहिल्या गोलचा समावेश आहे. त्यावेळी इटलीने ब्राझीलवर 3-2 असा विजय मिळविला तर प.जर्मनीला 3-1 असे नमवून इटलीने जेतेपद पटकावले होते. याशिवाय त्यांनी सर्वाधिक गोलसाठी दिला जाणारा गोल्डन बूट व स्पर्धेचा मानकरी असे बहुमान पटकावले होते. स्पर्धेचे तीनही पुरस्कार मिळविणारे रॉस्सी हे इटलीचे एकमेव फुटबॉलपटू आहेत. 1982 मध्ये त्यांना फिफाचा वर्षातील सर्वोत्तम खेळाडूचा पुरस्कारही मिळाला होता.
त्यांच्या सन्मानार्थ इटली सॉकर फेडरेशनने ध्वज अर्ध्यावर फडकवण्याची घोषणा केली आहे. रॉस्सी यांनी क्लब फुटबॉलमध्येही शानदार प्रदर्शन केले होते. युवेंटसतर्फे खेळताना त्यांनी दोनदा सिरी ए अजिंक्यपद आणि एकदा युरोपियन चषक पटकावला होता. समालोचनाकडे वळण्यापूर्वी त्यांनी एसी मिलानचेही काही काळ प्रतिनिधित्व केले होते. त्यांनी इटलीतर्फे 48 आंतरराष्ट्रीय सामन्यात 20 गोल नोंदवले असून त्यापैकी 9 गोल विश्वचषक स्पर्धेतील आहेत. त्यातील तीन गोल 1978 च्या विश्वचषक स्पर्धेत नोंदवले होते.









