प्रतिनिधी /काणकोण
काणकोणचे माजी आमदार इजिदोर फर्नांडिस यांनी 24 रोजी काणकोण मतदारसंघातून अपक्ष या नात्याने उमेदवारी अर्ज काणकोणच्या उपजिल्हाधिकारी कार्यालयात दाखल केला. काणकोणचे निर्वाचन अधिकारी उदय प्रभुदेसाई यांनी अर्ज स्वीकारला.
त्यानंतर स्थानिक पत्रकारांशी बोलताना फर्नांडिस यांनी सांगितले की, आपण मागच्या अडीच वर्षांत जी विकासकामे काणकोण मतदारसंघात केलेली आहेत त्यामुळे आपल्याविषयीची आस्था आणि विश्वास मतदारांमध्ये वाढलेला आहे. आपण जरी काँग्रेसचा त्याग करून भाजपात प्रवेश केलेला असला, तरी सध्या आपण कोणत्याच पक्षाचा सदस्य नाही. भाजपाने उमेदवारी नाकारल्यानंतर कार्यकर्त्यांच्या आग्रहामुळे आपण निवडणुकीत उतरलो आहे. यावेळी आपण 14 हजार इतकी मते घेऊन विजयी होणार, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
उमेदवारी अर्ज दाखल केल्यानंतर इजिदोर फर्नांडिस यांचे काणकोण भाजप मंडळाचे अध्यक्ष नंदीप भगत, युवा मोर्चाचे अध्यक्ष सतीश गोसावी, सूरज कोमरपंत, माजी नगराध्यक्ष समीर देसाई, नगरसेवक धीरज ना. गावकर, जिल्हा पंचायत सदस्या शोभना वेळीप, गावडोंगरीच्या सरपंच अंजली गावकर, उपसरपंच कुष्टा गावकर, पंच श्रीमती मडिवाळ, खोतीगावचे सरपंच दया गावकर, पैंगीणचे सरपंच जगदीश गावकर, उपसरपंच एल्डा फर्नांडिस, श्रीस्थळचे माजी सरपंच देवेंद्र नाईक, लोलयेचे सरपंच सचिन नाईक, माजी सरपंच अजय लोलयेकर, निशांत प्रभुदेसाई, अन्य पंचायतींचे पंच आणि समर्थकांनी स्वागत केले. यावेळी बोलताना नंदीप भगत यांनी फर्नांडिस यांना पाठिंबा व्यक्त केला आणि विजयाची खात्री दिली.









