पोलिसांनी वेळीच हस्तक्षेप केल्याने अनर्थ टळला, संबंधीत हातगाडी चालकाविरोधात गुन्हा दाखल
प्रतिनिधी / इचलकरंजी
इचलकरंजी नगरपालिकेने फुटपाथवरील वाढलेल्या अतिक्रमणविरोधी धडक मोहीम हाती घेतली आहे. या मोहिमेच्या बुधवारच्या दुसऱ्या दिवशी अतिक्रमण निर्मूलन पथकाच्या अधिकाऱ्यांसमोर एका चिकन ६५च्या हातगाडी चालकाने स्वत:च्या अंगावर डिझेल ओतून घेवून आत्महत्त्या करण्याचा प्रयत्न केला. सलमान कादर मुल्ला (रा. स्वामी मळा, इचलकरंजी) असे त्याचे नाव आहे. त्यांचा हा प्रयत्न बंदोबस्तासाठी तैनात असलेल्या इचलकरंजी शहर वाहतूक नियंत्रण शाखेचे हवालदार मारुती गवळी यांनी यामध्ये वेळीच हस्तक्षेप करुन हाणून पाडला.
शहरातील सर्वच रस्त्यांवर फेरीवाल्यांनी अतिक्रमणाचा विळखा घातला आहे. त्यामुळे त्याचा परिणाम वाहतुकीवर होवू लागल्याने, याविषयी नागरिकांतून नगरपालिकेच्या अतिक्रमण निर्मूलन पथकाबरोबर पालिका प्रशासनाविरोधी नाराजी व्यक्त केली जात होती. यांची नगरपालिका प्रशासनाने गांभीर्याने दखल घेवून मंगळवारपासून शहरातील अतिक्रमण हटाव मोहिम हाती घेतली आहे. या मोहिमेचा बुधवार हा दुसरा दिवस होता. या दिवशी अतिक्रमण निर्मूलन पथकाने शहरातील मध्यवर्ती बसस्थानक ते डेक्कन चौक या रस्त्यावरील अतिक्रमण काढण्यास सुरुवात केली होती.
या पथकाचे अधिकारी व कर्मचारी दुपारी डेक्कन चौक परिसरातील अतिक्रमणे काढीत होते. दरम्यान, सलमान कादर मुल्ला हा हातगाडीवाला आला. त्यांने कोणाशी काहीही न बोलता सरळ अतिक्रमण निर्मूलन पथकाचे प्रमुख सुभाष आवळे यांच्याकडे धाव घेतली. त्यांच्या समोर येताच वॅनमधील डिझेल स्वत:च्या अंगावर ओतून पेटवून घेण्याचा प्रयत्न करु लागला. हा प्रकार बंदोबस्तासाठी तैनात असलेल्या शहर वाहतूक नियंत्रण शाखेचे हवालदार मारुती गवळी यांनी त्यांच्या दिशेने धाव घेतली. त्याच्या हातातील काडीपेटी हिसकावून घेत त्याला ताब्यात घेतले. ही माहिती अतिक्रमणे काढत असलेल्या पालिकेच्या कर्मचाऱ्यांना समजताच त्यांनी त्वरित घटनास्थळी धाव घेवून मुल्ला याला पकडून शिवाजीनगर पोलीस ठाण्यात आणले. पोलिसांनी मुल्ला विरोधी सरकारी कामात अडथळा आणणे, पूर्वसुचना न देता आत्मदहनाचा प्रयत्न करणे आदीबाबत गुन्हा दाखल करण्याचे काम सुरु केले आहे.
मुल्ला याची शहरातील राजर्षी शाहू पुतळ्यालगत चिकन ६५ चा हातगाडा असतो. या परिसरातील नगरपालिकेच्या अतिक्रमण निर्मूलन पथकाकडून कारवाई सुरुच केलेली नाही. तरीदेखील उद्या किंवा परवाच्या या भागातील अतिक्रणावर कारवाई होईल. त्या कारवाईला अडथळा निर्माण करण्यासाठी त्याने अंगावर डिझेल ओतून पेटवून घेण्याचा प्रयत्न केल्याची चर्चा पालिकेत आहे.