ऑनलाईन टीम
गेल्या काही दिवसापासून पेट्रोल आणि डिझेलच्या दरात सतत वाढ होत आहे. यातच आज (रविवार) पुन्हा सरकारी तेल कंपन्यांनी डिझेल आणि पेट्रोलचे दर वाढवले आहेत. वाढत्या दरामुळे सामान्य नागरिक मेटाकुटीला आला आहे. या पार्श्वभूमीवर पेट्रोल-डिझलचे दर कधी कमी होणार, याकडे सर्वांचे लक्ष लागून आहे. मात्र केंद्रीय पेट्रोलियम मंत्र्यांनी दिलेल्या संकेतानंतर जनतेच्या पदरी निराशाच राहणार आहे. तेलाच्या किंमतीमध्ये कोणतीही कपात केली जाणार नसल्याचे संकेत केंद्रीय पेट्रोलियम मंत्र्यांनी दिले आहेत.
केंद्रीय पेट्रोलियम आणि नैसर्गिक वायू मंत्री हरदीप सिंह पुरी यांनी पेट्रोल-डिझलच्या दरात कोणतीही कपात केली जाणार नसल्याचे म्हटले आहे. दिल्लीत एका कार्यक्रमात बोलताना हरदीप सिंह पुरी म्हणाले की, कोरोना येण्यापूर्वीच्या तुलनेत आज पेट्रोल आणि डिझेलचा वापर अनुक्रमे १०-१५% आणि ६-१०% वाढला आहे. मी किंमतीवर जाणार नाही. आम्ही पेट्रोल आणि डिझेलच्या किंमती स्थिर करण्याचा प्रयत्न करत आहोत असे ते म्हणाले.
आज, रविवारी दिल्लीत डिझेल आणि पेट्रोल या दोन्हीच्या किमतीत ३५ पैशांनी वाढ झाली आहे. दिल्लीमध्ये एक लिटर पेट्रोलसाठी १०५.८४ रुपये आणि डिझेलसाठी ९४.५७ रुपये मोजावे लागत आहेत. तर, मुंबईत पेट्रोलचे दर १११.७७ आणि डिझेल १०२.५२ रुपयांवर पोहचले आहे.