ऑनलाईन टीम / ठाणे :
डोंबिवली-ठाकुर्ली स्थानकांदरम्यान एक्स्प्रेसचं इंजिन बंद पडल्याने मध्य रेल्वेची वाहतूक विस्कळीत झाली आहे. मध्य रेल्वेची वाहतूक जवळपास अर्धा तास उशिराने सुरु आहे. पाटणा एक्स्प्रेसचं इंजिन बंद पडल्यामुळे जलद मार्गावरील वाहतूक धीम्या मार्गावर वळवण्यात आली आहे.
कल्याणहून मुंबईकडे येणारी वाहतूक धीम्या मार्गावर वळवली आहे. बंद पडलेल्या इंजिनाची दुरुस्ती करण्यासाठी किंवा एक्स्प्रेसला नवे इंजिन जोडण्यासाठी कमीत कमी अर्धा ते पाऊण तासाचा कालावधी आवश्यक असल्याचे सांगितले जात आहे.
दरम्यान मध्य रेल्वेची वाहतूक विस्कळीत झाल्याने प्रवाशांची गैरसौय व अनेक स्थानकांवर प्रवाशांची गर्दी झाली आहे.