संरक्षणमंत्र्यांचा चीनला इशारा : लडाखमधील सुरक्षास्थितीचा घेतला आढावा : जवानांना केले संबोधित
लेह / वृत्तसंस्था
भारत आणि चीनदरम्यान सध्या सुरू असलेली चर्चा सकारात्मक आहे. या वादावर तोडगा निघणे अपेक्षित आहे. पण हा तोडगा कधी निघेल याची सध्या कोणतीही हमी देता येत नाही. मात्र, भारताची एक इंचही जमीन आम्ही सोडणार नाही. जगातील कोणतीही ताकद आमच्या जमिनीला हात लावू शकत नाही, असा इशारा केंद्रीय संरक्षणमंत्री राजनाथ सिंग यांनी शुक्रवारी दिला. लेह-लडाख दौऱयादरम्यान जवानांना संबोधित करताना त्यांनी कठोर शब्दात शत्रूराष्ट्रांना हा इशारा दिला आहे.
आमच्या स्वाभिमानावर हल्ला करण्याचा प्रयत्न झाल्यास त्याला जशास तसे उत्तर दिले जाईल, असे राजनाथ सिंग लडाखमधील लुकुंग चौकीवर भारतीय लष्कराच्या जवानांना संबोधित करताना म्हणाले. लडाखमधील तणावाच्या पार्श्वभूमीवर सुरक्षास्थितीचा आढावा घेण्यासाठी संरक्षणमंत्री राजनाथ सिंग शुक्रवारी सकाळीच लडाखमध्ये दाखल झाले होते. त्यांच्यासोबत चीफ ऑफ डिफेन्स स्टाफ बिपिन रावत आणि लष्करप्रमुख मनोज नरवणे हेसुद्धा उपस्थित होते. त्यांनी लडाखमधील सध्याची परिस्थिती समजून घेत जवानांचे मनोबलही वाढवण्याचा प्रयत्न केला. यापूर्वी पंतप्रधान नरेंद्र मोदींनी लडाखचा दौरा करुन जवानांचे मनोबल उंचावले होते.
तणाव नको, शांतता हवी !
आम्हाला तणावाऐवजी शांतता हवी आहे. भारताने कोणत्याही देशाच्या स्वाभिमानावर कधी हल्ला केला नाही. परंतु आमच्या स्वाभिमानावर हल्ला करणाऱयास योग्य धडा शिकविला जाईल, असेही ते म्हणाले. भारतीय जवानांची ताकद अफाट असल्यामुळे भारतीय जमिनीवर कोणीही कब्जा करू शकणार नाही याची मी शाश्वती देतो, असे सांगत राजनाथ सिंग यांनी जवानांचे मनोबल वाढविण्याचा प्रयत्न केला.
भारतीय सैनिकांचा अभिमान
चीनच्या सैनिकांसोबत झालेल्या प्राणघातक संघर्षात देशाच्या सुरक्षेसाठी बलिदान देणाऱया सैनिकांचा मला अभिमान वाटतो, असे संरक्षणमंत्री म्हणाले. त्यांनी देशासाठी बलिदान देणाऱया वीरांना श्रद्धांजली अर्पण केली. लडाख दौऱयाच्या निमित्ताने संरक्षणमंत्र्यांनी कारगिलची लढाई लढलेल्या तसेच त्या लढाईत बलिदान देणाऱया वीरांचेही स्मरण केले. सैनिकांनी फक्त भारताच्या भूभागाचेच नाही तर कोटय़वधी भारतीय नागरिकांच्या सन्मानाचे रक्षण केले, असे ते म्हणाले.
पंतप्रधानांची केली स्तुती
भारत हा एकमात्र शांतता तत्वावर चालणारा आणि संपूर्ण जगाला कुटुंब मानणारा देश आहे, असेही राजनाथ सिंह म्हणाले. आम्ही शांततेवर विश्वास ठेवतो मात्र आमच्या स्वाभिमानावर बोट ठेवल्यास आम्ही त्याला जशास तसे उत्तर देऊ, असे ते म्हणाले. तसेच भारताचे नेतृत्व खंबीर आहे, असे म्हणत त्यांनी पंतप्रधानांचे कौतुक केले.
जवानांनी दाखवले कौशल्य
लडाखमध्ये तैनात जवानांनी संरक्षण मंत्र्यांना आपली ताकद दाखवून दिली. पॅराशूट रेजिमेंटच्या कमांडोंनी त्यांच्यासमोर पॅराशूटच्या सहाय्याने जमिनीवर उतरण्याचे आपले कौशल्य सादर केले. तसेच जवानांनी टी-90 टँक, ऍटॅक हेलिकॉप्टर आणि पॅरा कमांडोच्या सहाय्याने युद्धाभ्यास केला. पॅराजम्पिंगचे हे कौशल्य पाहून राजनाथ सिंग यांनी समाधान व्यक्त केले. तसेच त्यांनी तेथील शस्त्रे आणि रणगाडय़ांची प्रत्यक्ष पाहणीही केली. यावेळी त्यांनी मशीनगन हातात घेऊन चालवूनही पाहिली.
…तर तणाव पुन्हा वाढण्याची शक्यता
पूर्व लडाखमध्ये नियंत्रण रेषेजवळ पुन्हा एकदा भारतीय आणि चिनी सैन्यामध्ये तणाव वाढू शकतो. सध्या दोन्ही देशाच्या वरिष्ठ अधिकाऱयांमध्ये तणाव कमी करण्यासाठी चर्चेच्या फेऱया सुरु आहेत. पूर्व लडाखमध्ये एकूण चार ठिकाणी भारतीय आणि चिनी सैन्य आमने-सामने आले होते. त्यातल्या तीन ठिकाणी चिनी सैन्य माघारी फिरले आहे. पण पँगाँग टीएसओ तलाव क्षेत्राजवळील फिंगर 4 वरुन मागे हटण्यास चीनने नकार दिल्यामुळे तणावाची स्थिती अद्याप संपुष्टात आली नसल्याचेच दिसून येत आहे.









